User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 
अर्नाळा
जिल्हा : पालघर उंची : लागू नाही
तालुका : वसई प्रकार : जलदुर्ग
परिसर : विरार ऋतू : सर्व
स्थळ : अर्नाळा समुद्रतट श्रेणी : सोपी – १
डोंगररांग : लागू नाही भटकंती : चांगली

प्रवास :

अर्नाळा हा किल्ला पालघर जिल्ह्यातील विरार या परिसरात अर्नाळा गावाजवळच्या अर्नाळा या बेटावर आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी प्रथम ठाणे जिल्ह्यातील विरार या लोहस्थानकास यावे. तेथून पश्चिमेला जवळच असणार्‍या विरार बस स्थानकातून अर्नाळा गावासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या जातात. अर्नाळा गाव हे तेथील समुद्रकिनार्‍यासाठी प्रसिद्ध असल्याने बसगाड्यांची ये-जा सुरुच असते. अर्धा एक तासामध्ये बस आपल्याला अर्नाळा गाव या बसथांब्यावर आणून सोडते. समुद्रकिनार्‍यावर न जाता कोळीवाड्यातून अर्नाळा बंदरावर जावे. तेथून अर्नाळा बेटावर जाण्यासाठी होड्या सुटतात. अतिशय कमी भाड्यात ह्या मच्छीमार होड्या आपल्याला अर्नाळा बेटावर नेतात. पण होडीत बसण्यापूर्वीच भाड्याविषयी बोलणी करून घ्यावी, त्यामुळे नंतर होणारा संभाव्य मनस्ताप टाळता येऊ शकतो.
(कृपया सूचना पहा)

माहिती :

अर्नाळा बेटावर उतरल्यावर तेथून अर्नाळा गाव व समुद्रकिनार्‍याचे होणारे दर्शन आश्चर्यकारक आहे कारण मुंबईजवळ असे एखादे बेट असू शकते ह्यावर विश्वास बसणे कठीण होते. या बेटावर अगदी १०-१५ मिनिटांतच आपल्याला अर्नाळा किल्ल्याचे दर्शन होते.

किल्ला प्रथमदर्शनीच बुलंद असल्याची जाणीव होते. अंदाजे ४४००० स्क्वे. फुट परिसराचा प्रदेश सामावून घेणारा हा किल्ला आयताकार आहे. किल्ल्याच्या उत्तर बाजूला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. २० फुट उंच कमान असणारा हा दरवाजा त्याच्या पाषाणी चौकटीवरील हत्ती, वाघ व कमलपुष्पांच्या नक्षीने अप्रतिम झाला आहे. मुख्य दरवाजा दोन बुलंद बुरुजांनी संरक्षित आहे. प्रवेश करताच दरवाज्यातील देवड्यांवर सुध्दा कोरीवकाम आढळते. प्रवेशद्वारासमोरच एक कोठीवजा खोली आहे. कदाचित ती द्वारपालांच्या राहाण्यासाठी किंवा कोठारासाठी उपयोगात आणली जात असावी. या दरवाज्याने डावीकडे किल्ल्यात प्रवेश होतो व तेथूनच किल्ल्यातील सगळा परिसर दृष्टीक्षेपात येतो.

किल्ल्याला एकूण तीन दरवाजे आहेत. उत्तरेकडील मुख्यदरवाजा आणि दक्षिणेचा चोर(?) दरवाजा. अंदाजे १० मीटर उंचीच्या १० भक्कम बुरुजांसह तेवढयाच उंचीची ३-५ मीटर रुंद तटबंदी हे या किल्ल्याचं वैशिष्ठ्य.

किल्ल्याच्या १० बुरुजांपैकी मुख्यादरवाज्याचा पश्चिमेकडील बुरुज, वायव्य कोपर्‍यातील बुरुज, आग्नेय कोपर्‍यातील बुरुज, पूर्वेकडील चौकोनी बुरुज, या बुरुजांमध्ये वरील भागात कोठारे किंवा छोटेखानी खोल्या केलेल्या आहेत. तर नैऋत्य कोपर्‍यातील बुरुज, दक्षिणेचा मधला बुरुज, या बुरुजांमध्ये आतल्या बाजूला कोठया आढळतात. या खोल्या बहुदा पहारेकर्‍यांच्या विश्रांतीसाठी केल्या गेल्या असाव्यात. पश्चिमेकडील दरवाज्याचा बुरूज व मुख्य दरवाज्याचा पश्चिम बुरुज या मध्ये तर छुपे चोर मार्गसुद्धा आहेत. त्यातील पहिला बहुदा आणीबाणीच्या प्रसंगी पलायानाकरिता तर दुसरा फक्त मुख्य दरवाज्यावर देख्ररेखीकारिता वापरता येत असावा.

किल्ल्याच्या आतील भागात असणार्‍या वास्तूंमध्ये पूर्वेकडील त्रिम्बकेश्वराचे देऊळ, त्यासमोरील अष्टकोनी पुष्करणी, पुष्करणी जवळील छोटे काळभैरवाचे मंदिर व नित्यानंद महाराजांच्या पादुका असलेली घुमटी, मध्यभागी असणारा शाहअली / शाहबाबा (?) दर्गा, पश्चिमेकडील दत्तमंदिर, त्यामोरील झाडाचा गोल कट्टा, मुख्यदरवाज्याजवळील वाड्याचे अवशेष, आग्नेय कोपर्‍यातील कोठार, तीन विहिरी व इतर काही ओळख न पटवता येणारे अवशेष आहेत.

किल्ल्याशिवाय अजून एक इतिहासकालीन बांधणी बेटाच्या दक्षिण बाजूस आहे. तो म्हणजे संपूर्ण गोलाकार असा एक सुटा बुरुज. हा बुरुज बहुदा टेहळणीसाठी वापरला जात असावा. या बुरुजात प्रवेश करण्यासाठी त्याच्या खाली एक खिडकीवजा मार्ग आहे. पण आज तो माती व झाडीने बुजला आहे. जर कि हा बुरुज आतून कसा आहे हे पहायचे असेल तर त्या बुरुजावर वाढलेल्या वनस्पतींची, तटबंदीला घट्ट चिकटलेली खोडे पकडून वर जाता येते. बुरुजाची तटबंदी अगदी सरळ व सलग आहे. त्यामुळे उतरतानाही काळजी घेणे फार आवश्यक आहे. म्हणूनच प्रस्तरारोहणाचे ज्ञान असलेल्या व्यक्तींनीच हे साहस करावे, इतरांनी ते करू नये.

याशिवाय किल्ल्याबाहेर कालिकामातेचे देऊळ, गणपतीचे देऊळ व काही विहिरी आहेत. किल्ल्याबाहेरील वस्ती ही प्रामुख्याने कोळी लोकांची आहे.

असा हा सुटा बुरुज असणारा भक्कम किल्ला पाहण्यासाठी बेटावर उतरल्यापासून २-३ तास पुरेसे होतात. त्यामुळे विरार-वसई जवळ असणारी इतर स्थळे पाहण्यास उरलेला वेळ वापरला जाऊ शकतो.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला तसे पाहता एकाच दिवसात पाहून होण्यासारखा असल्याने तेथे राहण्याची आवश्यकता भासत नाही पण तरीसुध्दा राहायचे झाल्यास किल्ल्यावर बर्‍याच ठिकाणी तसेच किल्ल्या बाहेरील कोळी लोकांच्या वस्तीत अशी सोय होऊ शकते.

जेवण: किल्ल्यावर किंवा बेटावर कोठेही उपहारगृहे वैगरे नाहीत. त्यामुळे खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत. बेटावरील कोळ्यांच्या वस्तीत आगाऊ सूचना दिल्यास तशी सोय होऊ शकते. अन्यथा अर्नाळा गावात तसेच विरार स्थानकाजवळ अनेक चांगली उपहारगृहे आहेत.

पाणी: किल्ल्यावर किंवा बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यामुळे पाण्याची व्यवस्था आहे.

सूचना :

किल्ल्यावर अर्नाळा गावातून जाणार्‍या होड्या भरती व ओहोटीच्या वेळांवर अवलंबून असतात, तसेच संध्याकाळनंतर ह्या होड्यांची सुविधा बंद होते. त्यामुळे पहिल्या व शेवटच्या होडीच्या वेळा नीट नमूद करून आपल्या भटकंतीची वेळ ठरवावी.
 

छायाचित्रे :

  • arnala-01
  • arnala-02
  • arnala-03
  • arnala-04
  • arnala-05
  • arnala-06
  • arnala-07
  • arnala-08

Simple Image Gallery Extended