User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 
शिरगाव
जिल्हा : पालघर उंची : लागू नाही
तालुका : पालघर प्रकार : जलदुर्ग / मिश्रदुर्ग
परिसर : सातपटी  ऋतू : सर्व
स्थळ : सातपटी  समुद्रतट श्रेणी : सोपी – १
डोंगररांग : लागू नाही भटकंती : चांगली

प्रवास :

दिवाळीतून मातीचे लहान किल्ले बांधण्याची परंपरा आपल्याकडे कित्येक शतके आहे. गावाकडे घराबाहेर बांधलेले हे किल्ले मनोहारी दिसतात. शहरातही आता हा ‘ट्रेंड’ वाढत चालला आहे. विचार करा, की घराजवळ किंवा शाळेच्या आवारात असाच एखादा खराखुरा किल्ला असेल तर काय मज्जा येईल.. मधल्या सुट्टीत ह्या किल्ल्यात मस्तपैकी खेळता-बागडता येईल. शाळा सुटल्यावरही मावळे बनून किल्ल्यात  वावरता येईल..

हे स्वप्न सत्यात उतरलं आहे ते सातपटी जवळील शिरगांवच्या मुलांच्या नशिबात. हो! जेमतेम एका एकरांत पसरलेला शिरगांवचा किल्ला चक्क शाळेच्या आवारात आहे. (खरंतर शाळा किल्ल्याच्या आवारांत बांधली गेली आहे.) तो आजही उत्तम स्थितीत आहे. परंतु आडवाटेला असल्यामुळे तसेच फारशी प्रसिद्धी न मिळाल्याने ह्या किल्ल्याची माहिती आजही लोकांना नाही.

माहिती :

शिरगांव हे ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात असणाऱ्या सातपटी जवळचे, कोळी लोकांची वस्ती असलेलं एक लहानुले गाव. सातपाटी समुद्राला खेटून हा किल्ला उभा आहे. रेल्वेने येणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरील ‘पालघर’ स्थानक (१६ कि.मी.) जवळचे आहे. एस.टी.ने येणाऱ्यांसाठीही पालघर (१६ कि.मी.) हेच स्थानक जवळची आहेत. तेथून पुढे शिरगांवसाठी नियमित बसगाड्यांची सोय आहे. अथवा स्थानकाहून खाजगी सहा आसनी रिक्षांची सोय उपलब्ध आहे. जेमतेम अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर ‘मशीद स्टॉप’ येथे उतरून प्राथमिक शाळेजवळ यावे. स्वतःच्या वाहनाने येणाऱ्यांसाठी थेट किल्ल्यापर्यंत डांबरी रस्त्याची सोय आहे. (कोळी वाड्यातील गल्ल्यांमुळे येथे वाहन चालवणे थोडे त्रासदायक होऊ शकेल.) शाळेला खेटूनच शिरगावचा किल्ला उभा आहे. 

आजही बुरुजांसह मजबूत तटबंदी लेवून उभा असलेला शिरगांवचा किल्ला शाळेच्या आवारांत पाहून कौतुक वाटते.

खरंतर ही शाळा किल्ल्याच्या आवारांत बांधली आहे, पण ‘किल्ला कुठे आहे?’ असं विचारल्यावर येथील लोक, ‘शाळेजवळ’ असं उत्तर देतात. त्यामुळे किल्ला शाळेच्या आवारांत आहे हे पटवून घ्यावे लागते. जेमतेम एक एकर क्षेत्रफळ सामावून घेत चौरसाकृती बांधलेल्या ह्या किल्ल्यामध्ये एका मोठ्या किल्ल्याचे सर्व भाग दिसून येतात.

उत्तर भागात, शाळेजवळच, टेहाळणीची घुमटी असलेला बुरुजाखाली किल्ल्याचा पूर्वाभिमुख मुख्य दरवाजा आहे. आत शिरल्यावर काटकोनात डाव्या बाजूला दुसरा दरवाजा आहे. मधल्या भागात उत्तर आणि पश्चिम बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवड्या केलेल्या आढळतात. प्रवेशद्वार दुमजली आहे. आत शिरताच किल्ल्याचा लहानपणा जाणवून येतो. किल्ल्यात नव्याने केलेली डागडुजी दिसून येते. जवळच एक चौकोनी हौद दृष्टीस पडतो. उत्तर आणि दक्षिण भागात आणि तटबंदीवर जाण्यासाठी बांधण्यात आलेले जीने दिसून येतात. संपूर्ण किल्ल्याला तटबंदीवरून (फांजीवरून) फेरी मारता येते. किल्ल्याच्या पश्चिम भागात कोठारे आणि कोठ्यांचे अवशेष दिसून येतात. दरवाज्यावरील मनोऱ्यांत दुमजली बांधकाम असून त्यात कोनाडे, खिडक्या, झरोके काढले आहेत. २-३ माणसे बसू शकतील एवढी जागा ह्या मनोऱ्यात आहे.

किल्ल्याच्या आग्नेय बुरुजावर जाण्यासाठी असणाऱ्या जीन्यांमध्ये छुपे दुमजली बांधकाम आढळते. आग्नेय बुरुजातून ह्या छुप्या खोल्यांमध्ये जाण्यासाठी मार्ग काढला आहे. बहुदा पहारेकऱ्यांच्या निवासासाठी ह्या खोल्या बांधल्या असाव्यात अथवा किल्ल्यातील महत्वाचे सामान ठेवण्यासाठी ही जागा वापरात असावी. दक्षिणेला किल्ल्याचा चोरदरवाजा आहे. प्रवेशद्वारावरील मनोऱ्याशी साधर्म्य दाखवणारे बांधकाम ईशान्य बुरुजावर आहे. मात्र येथील मनोरा मोठा आहे. एखाद्या हवामहालातील मनोरा वाटावा असे हे बांधकाम दिसून येते. येण्या-जाण्यासाठी वक्राकार दगडी जीनादेखील येथे आहे. किल्ल्यात इतरही लहान-सहान अवशेष आहेत. नवीन बांधकामामुळे जुने अवशेष लुप्त होत चालले आहेत.

किल्ल्याची रचना, त्यातील कलाकुसर पाहता हा किल्ला, चौकी नसून एखादी गढी असावा असे वाटते. किल्ल्यात असणाऱ्या एकूण ५ बुरुजांपैकी प्रवेशद्वाराजवळ एक अर्धगोलाकार, नैऋत्येचा शंकरपाळ्याच्या आकाराचा एक, तर उर्वरित तीन अष्टकोनी आहेत. किल्ल्यात (आणि किल्ल्याबाहेरही) अनेक ‘रावणमाड’ आहेत. मात्र ती लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

किल्ला संपूर्ण नीट पाहण्यासाठी १-२ तास पुरेसे आहे. 

सोयीसुविधा :

निवारा: किल्ल्यात राहण्याची सोय नाही. हा किल्ला एका दिवसांत पाहून होण्यासारखा असल्याने तेथे राहण्याची गरज भासत नाही. मात्र तरीही रहायचे झाल्यास पालघर येथे उत्तम विश्रामगृहे उपलब्ध आहेत.

जेवण: किल्ल्यात जेवणाची सोय नाही. वस्तीत चहा-नाश्त्याची सोय होऊ शकेल. पालघर येथे उत्तम उपहारगृहे उपलब्ध आहेत.

पाणी: किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. वस्तीत पाणी मिळेल.

सूचना :

लागू नाही.

छायाचित्रे :

  • shirgaon-01
  • shirgaon-02
  • shirgaon-03
  • shirgaon-04
  • shirgaon-05
  • shirgaon-06
  • shirgaon-07
  • shirgaon-08
  • shirgaon-09
  • shirgaon-10

Simple Image Gallery Extended