User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 
तिकोना
जिल्हा : पुणे उंची : ३२७३ फुट
तालुका : मावळ प्रकार : गिरीदुर्ग
परिसर : कामशेत ऋतू : सर्व
स्थळ : तिकोना पेठ श्रेणी : सोपी – २
डोंगररांग : लोणावळा भटकंती : उत्तम

प्रवास :

पुणे जिल्ह्यातील पवन मावळ परिसरात अनेक किल्ले आहेत. त्यातील लोहगड-विसापूर किल्ल्याची जोडगोळी प्रसिद्ध आहे. पण ह्या किल्ल्यावरून आग्नेय दिशेला दिसणारा, पवना जलाशयापलीकडचा त्रिकोणी माथ्याचा डोंगर, हा एक किल्ला आहे, हे अनेकांना माहित नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, काय ‘स्पेशल’ आहे ह्या त्रिकोणी अज्ञात डोंगरामध्ये?’. तर त्याचे उत्तर म्हणजे हा डोंगर म्हणजेच किल्ले ‘तिकोना’.

तर त्रिकोणी माथ्याचा म्हणून ह्या किल्ल्याला तिकोना नाव पडले असावे. मुंबई-पुणे हमरस्त्यालगत ऐन मावळात असणारा हा किल्ला पवनमावळच्या लोहगड - विसापूर - तूंग - तिकोना ह्या दुर्ग-चौकडीपैकी एक आहे. तिकोना किल्ल्याला भेट देण्यासाठी लोणावळा-पुणे मार्गावरील ‘कामशेत’ हे रेल्वेस्थानक जवळचे आहे. कामशेतहून पौड किंवा मोरवे बसगाडीने ‘तिकोना पेठ’ ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचता येते. कामशेतहून काळे कॉलनी येथे येऊनही तिकोना पेठेसाठी बसगाडी किंवा खासगी जीप/रिक्षा मिळू शकतात. गाडीने कामशेत ते तिकोना पेठ हे अंतर तासभराचे आहे.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

तिकोना पेठेतून किल्ला सुरेख दर्शन देतो. स्वतःचे वाहन आणले असल्यास किल्ल्याच्या ईशान्य भागात नव्याने वाहनतळ उभारला आहे, तेथे पार्किंगची सोय होते. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक गावातून समोर दिसणारी, वायव्य सोंडेवरून जाते तर दुसरी गडाच्या पूर्व सोंडेवरून किल्ल्यावर नेते. वायव्य दिशेची वाट खड्या चढाची, निसरडी असल्यामुळे अवघड आहे. ह्या वाटेने गडावर जाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. तर पूर्वेकडील वाट आपल्या सगळ्यांसाठी आहे. वाहनतळाजवळूनच ही वाट सुरु होते. ह्या वाटेने गडावर जाण्यास पाऊण-एक तास लागतो.

पूर्व वाटेने किल्ल्यावर पोहोचताना बालेकिल्ल्याचा पूर्व बुरुज सतत आपल्या सोबतीला असतो. सोंडेच्या अरुंद वाटेवरून जाताना सर्वप्रथम कातळात खोदलेलं एक भुयारी प्रवेशद्वार पार करावं लागतं. ७ फूट उंच आणि ६ फूट रुंद अश्या ह्या भुयारी प्रवेशद्वारात डाव्या बाजूस देवडी कोरलेली आहे. पुढे थोड्या अंतरावर दुसरे प्रवेशद्वार सामोरे येते. दरीकडे तोंड करून उभ्या असलेल्या दोन मजबूत बुरुजांमधील ह्या प्रवेशद्वाराची कमान मात्र आजमितीस ढासळली आहे. ह्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे भुयारी मार्गावर असणाऱ्या बुरुजावर जाता येतं. या भागात शेंदूर फसलेले काही दगड दिसतात. पुन्हा वायव्य दिशेकडे बालेकिल्ल्याच्या टेकडीची उजवीकडील वाट पकडून पुढे गेल्यावर मारुतीरायाचं एक ६-७ फूट उंच शिल्प लक्ष वेधून घेतं. डावा हात कटीवर घेऊन उजवा हात काटकोनात वर करून आशीर्वाद देणारा हा मारुतीराया आवेशात दिसतो. त्याच्या डाव्या पायाखाली एक बाई दाखवली आहे. या शिल्पाच्या खालच्या भागात हातात फुलांच्या माळा घेतलेल्या दोन स्त्रियादेखील कोरल्या असल्याची माहिती काही जुन्या पुस्तकांत मिळते, परंतु आजमितीस त्या शिल्पात दिसत नाहीत.

येथून पुढे आपण बालेकिल्ल्याच्या पोटात कोरलेल्या लेण्याजवळ येतो. समोर एक गोलाकार तळे असलेल्या आणि अर्धवट खोदकाम झालेल्या ह्या लेण्यामध्ये एक साधू वास्तव्य करून आहेत. लेण्यांमध्ये देव बसवून त्यांची देऊळे केली आहेत. लेण्याच्या पश्चिम भागात, डोंगरावरून वाहत येणारे पाणी साठविण्याची सोय असलेले पाण्याचे एक टाके कोरले आहे. या भागात सातवाहन कालीन जात्याची तळी सापडल्याचे उल्लेख आहेत. जवळच तुळशी वृंदावन आहे.

येथून पुढे बालेकिल्ल्याच्या चढाईची वाट, पायऱ्यांनी सुरु होते. सुरुवातीलाच चुन्याचा घाणा दिसून येतो. २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर, दरीच्या बाजूला खणखणीत बुरुज घेऊन उभा असलेला गडाचे तिसरे प्रवेशद्वार स्वागत करते. ७ फूट उंच आणि ३ फूट रुंद चौकटीतून आपला प्रवेश होतो. दरवाज्यालगत उजवीकडे गुहेत पाण्याची टाकी खोदलेली आहेत. डाव्या बाजूला बुरुजावर जाता येते. त्याच्यावर पुढील दरवाज्याच्या तटबंदीचा उंच बुरुज आहे. ह्या दणकट बुरुजाने सुरक्षित केलेल्या आणखी चाळीस एक अतिउंच आणि खड्या पायऱ्या चढून गेल्यावर गडाचे चौथे प्रवेशद्वार लागते. खड्या पायऱ्यांमुळे मागे तोल जाऊन पडण्याची भीती असल्याने पायऱ्यांचा हा टप्पा फार जपून चढावा लागतो. गडाचे चौथे प्रवेशद्वार आजही उत्तम स्थितीत आहे. दोन बाजूंना खणखणीत बुरुज ठेवून उभे असलेले हे प्रवेशद्वार आणि त्यासमोरील उंच बुरुज भेदक वाटतात. ह्या दरवाज्यातून आत शिरताच डावीकडे कातळात खोदलेल्या काही गुहा आणि पाण्याची टाकी आहेत. यातील शेवटचे टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे तर सुरुवातीच्या कोपऱ्यातील गुहेत १०-१२ जणांची राहण्याची सोयही होते.

येथून जवळच गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे गडाचे पाचवे प्रवेशद्वार आहे. या दरवाज्यातून प्रवेश करताच समोर त्रिंबकेश्वर (तिकोनेश्वर) महादेवाचे चौरस देऊळ आहे. देवळात एक घडीव शिवलिंग आहे. देवळाच्या उत्तन दिशेला गोमुख आहे. त्रिंबकेश्वरावर होणाऱ्या अभिषेकाचे तीर्थ ह्या गोमुखातून वाहते होते. देवळाखाली पाण्याचे टाके आहे. त्याजवळ एक भंगलेला नंदी आणि शिवलिंग आहे. माथ्याला सर्व बाजूंनी तटबंदीने संरक्षित केले आहे. सर्वोच्च टोकाशी काही जोत्यांचे अवशेष आढळतात. किल्ल्याच्या त्रिकोणी माथ्याला तीनही बाजूस बुरुज आहेत. उत्तरेकडील बुरुजावर ध्वजस्थंभ आहे. येथे नैऋत्य दिशेला एक बांधीव हौद आहे.

लेण्यांकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाटेने गडाचा सहावा दरवाजा गाठता येतो. परंतु ही वाट वापरात नसल्याने अवघड झाली आहे. त्यात संपूर्ण घसारा आणि निसरडी वाट यांमुळे ह्या वाटेने गडावरून उतरणे/चढणे धोकादायक आहे.

किल्ल्यावरून तिकोना पेठ गाव, पवना जलाशय आणि त्यामागील तूंग, लोहगड आणि विसापूर किल्ले असा विस्तृत परिसर दिसून येतो. संपूर्ण किल्ला पाहण्यास दोन-अडीच तर पुरेसे आहेत.

सोयीसुविधा :

निवारा: तिकोना किल्ला एका दिवसात संपूर्ण पाहून होत असल्याने तेथे राहण्याची गरज भासत नाही. तरीसुद्धा राहायचे झाल्यास किल्ल्यावरील चौथ्या दरवाज्याजवळ असणाऱ्या गुहेत १०-१२ जणांची राहण्याची सोय होऊ शकते किंवा तिकोना पेठ गावात निवारा उपलब्ध होईल.

जेवण: किल्ल्यावर कोठेही अन्नाची सोय नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ सोबत बाळगावेत. तिकोना पेठ गावात आगाऊ सूचना देऊन जेवणाची व्यवस्था करता येईल. अन्यथा काळे कॉलनी, कामशेत येथे उत्तम उपहारगृहे आहेत.

पाणी: किल्ल्यावर पाण्याची टाकी आहेत. अन्यथा तिकोना पेठ गावातून पाणी भरून घ्यावे.

सूचना :

वायव्य दिशेची वाट वापरात नसल्याने अवघड झाली आहे. त्यात संपूर्ण घसारा आणि निसरडी वाट यांमुळे ह्या वाटेने गडावरून उतरणे/चढणे धोकादायक आहे.

छायाचित्रे :

 • tikona-01
 • tikona-02
 • tikona-03
 • tikona-04
 • tikona-05
 • tikona-06
 • tikona-07
 • tikona-08
 • tikona-09
 • tikona-10
 • tikona-11
 • tikona-12
 • tikona-13
 • tikona-14
 • tikona-15
 • tikona-16
 • tikona-17
 • tikona-18
 • tikona-19
 • tikona-20

Simple Image Gallery Extended