User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 
कलावंतीणदुर्ग
जिल्हा : रायगड उंची : २०७० फुट
तालुका : कर्जत प्रकार : गिरीदुर्ग
परिसर : पनवेल ऋतू : सर्व
स्थळ : शेंडुंग / ठाकूरवाडी श्रेणी : सोपी – ३
डोंगररांग : माथेरान भटकंती : उत्कृष्ठ

प्रवास :

पनवेल – मुंबईला कोकणास जोडणारा दुवा. पनवेलहून आग्नेय दिशेला पाहिल्यास समोरील डोंगरांमध्ये इंग्रजी ‘व्ही’ अक्षरासारखी खाच दिसून येते. त्यात टोकाकडे सुटा पडलेला समोश्यासारखा त्रिकोणी डोंगर म्हणजे कलावंतीणदुर्ग. पनवेल बसस्थानकातून शेंडूग येथे जाण्यासाठी वरचेवर बसगाडया आहेत. अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच बसगाडी आपणास शेडूंग फाट्यावर पोहोचवते. फाट्यापासून पूर्वेस दिसणारा ईर्शाळगड उत्तम दर्शन देतो. ठाकूरवाडी हे कलावंतीणदुर्गाच्या पायथ्याचे गाव. शेडूंग फाट्याहून ठाकूरवाडीस जाण्यास सहाआसनी रिक्शांची सोय आहे (भाडे सुरुवातीलाच ठरवून घ्यावे.) सकाळी वेळेत पोहोचल्यास पनवेलहून थेट ठाकूरवाडी अशी बसगाडी सुद्धा मिळू शकते. शेडूंग फाटा ते ठाकूरवाडी हे अंतरही साधारण अर्ध्या तासाचे आहे.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

ठाकूरवाडी हून त्रिकोणी डोंगर नजरेसमोर ठेवत बऱ्यापैकी मळलेल्या वाटेने झाडीतून प्रबळ माचीस पोहोचावे. वाटेवर कडेला एक १०-१२ फुटी सुळका आहे. पुढे गणपती व मारुतीचे शिल्प कोरलेला दगड आहे. तेथून अगदीच जवळ प्रबळ माची हे ८-१० घरे असलेले गाव आहे. ठाकूरवाडी ते प्रबळ माची हे अंतर जेमतेम दोन तासांचे आहे.

प्रबळ माचीतून कलावंतीणदुर्गाची खाच (खिंड) गाठावी. उजवीकडे सतत सोबत करणारा प्रबळगड उजवीकडे प्रसन्न दर्शन देत राहतो. या खिंडीतून दुर्गासाठी पायऱ्या आहेत, पण त्यातील बऱ्याचशा अंगावर येणाऱ्या, खड्या आहेत. शेवटच्या टप्प्यात बराच घसारा आहे, त्यामुळे चढताना, विशेषतः पावसाळ्यात, अतिशय काळजी घेण आवश्यक आहे. निष्काळजीपणाची शिक्षा फक्त मृत्यू हीच आहे हे लक्षात ठेवूनच पायऱ्या चढाव्यात. पायऱ्या चढताना एवढा खटाटोप करून त्या कोणी बनविल्या असतील याचे अजब वाटते. पायऱ्या संपताच डावीकडे एक पाण्याचे टाके लागते. आवश्यकता नसल्यास तेथे जाण्याचा खटाटोप करू नये. त्यावर असणारी छोटी सपाटी आणि मध्यभागी कातळाचा पसरट सुळका म्हणजेच कलावंतीणदुर्ग. १५-२० फुट कातळाचा हा सुळका जरी दृष्टीभय निर्माण करणारा असला तरीही तो विनासायास चढता येतो. वर पोहोचताच मिळणारा आनंद शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा आहे.

वरून मलंगगड, चंदेरी, तावली, मागच्या बाजूस माथेरानची डोंगररांग आदी बराचसा प्रदेश न्याहाळता येतो. मुख्यतः सोबत असणाऱ्या प्रबळगडाची प्रचंडता लक्ष वेधून घेणारी आहे. संपूर्ण गड पाहायला एक तास पुरेसा आहे. खरेतर हा गड एक सुळकाच असल्याने उत्तम पायऱ्या सोडल्यास, प्रेक्षणीय असे काही नाही.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला तसे पाहता एका दिवसात पाहून होण्यासारखा असल्याकारणाने तेथे राहण्याची व त्यामुळेच निवाऱ्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीसुद्धा राहायचे झाल्यास पनवेल बसस्थानकावर राहू शकतो.

जेवण: ठाकूरवाडी गावापासून पुढे किल्ल्यापर्यंत कोठेही अन्नाची सोय नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत. पनवेलपासून शेंडूग गावापर्यंत अनेक चांगली उपहारगृहे उपलब्ध होतील.

पाणी: किल्ल्यावर पाण्याचे टाके आहे, पण त्याच्या शुद्धतेची खात्री देता येत नाही. ठाकूरवाडी गावात विहिरीचे पाणी उपलब्ध होईल.

सूचना :

संपूर्ण किल्ला हा एक सुळकाच आहे. चढाई बऱ्यापैकी अवघड आहे. पायऱ्या अंगावर येणाऱ्या खड्या तसेच घसाऱ्याच्या असल्याने अतिशय काळजीची आवश्यकता आहे. दुर्लक्ष करू नये.

छायाचित्रे :

 • kalawantin-01
 • kalawantin-02
 • kalawantin-03
 • kalawantin-04
 • kalawantin-05
 • kalawantin-06
 • kalawantin-07
 • kalawantin-08
 • kalawantin-09
 • kalawantin-10
 • kalawantin-11
 • kalawantin-12

Simple Image Gallery Extended