User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 
कर्नाळा
जिल्हा : रायगड उंची : १४०७ फुट
तालुका : पनवेल प्रकार : गिरीदुर्ग
परिसर : पनवेल ऋतू : सर्व
स्थळ : कर्नाळा अभयारण्य श्रेणी : सोपी – ३
डोंगररांग : माथेरान भटकंती : उत्तम

प्रवास :

‘लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला’ – गो. नि. दांडेकरांच्या जैत रे जैत या चित्रपटात आग्या माशीचे स्थान असणारा सुळका प्रेक्षकांमध्ये फारच प्रसिद्ध झाला. हा सुळका ज्या ठिकाणी आहे त्याला वेढून एक किल्ला आहे – किल्ले कर्नाळा. पायथ्याचे पक्षी अभयारण्य आणि माथ्यावरचा सुळका ह्यामुळे हा किल्ला आज लोकांना बऱ्यापैकी माहित झाला आहे.

पनवेलपासून कर्नाळा पक्षी अभयारण्याकडे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या नियमित बसगाडया आहेत. अवघ्या अर्ध्या तासात बस आपल्याला कर्नाळा पक्षी अभयारण्यापाशी सोडते.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

कर्नाळा पक्षीअभयारण्य बसथांब्याजवळच कर्नाळा पक्षीअभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. माफक प्रवेशशुल्क भरून कर्नाळा पक्षीअभयारण्यात प्रवेश मिळतो. किल्ल्याची वाट या अभयारण्यातूनच जाते. संरक्षित अभयारण्य काय असते, ते आतून कसे असते ह्याचा प्रत्यय हे अभयारण्य पाहताना येतो. या अभयारण्यात कोणत्याही वेळी कमीतकमी ५०-६० जातींचे पक्षी पाहता येतात हे आतापर्यंत कट्टर पक्षीनिरीक्षकांना उमजले आहे. पण आपल्यातील काही अतिशहाणी मंडळी सहलींच्या नावाखाली धिंगाणा घालतात ज्यामुळे पक्षी निरीक्षणे तर दूरच दिसणेही कठीण होते. धांगडधिंग्यानेच सहली संपूर्ण होतात असा समाज जोवर नष्ट होत नाही तोवर आपल्याला निसर्गाचे खरे दर्शन होत नाही हे आपल्या सर्वांनाच समजले पाहिजे. असो, तर अशा वाटेने आत गेल्यावर पूर्वी सहज दर्शनासाठी बंदिस्त केलेल्या पण आज रिकाम्या असणाऱ्या प्राणी-पक्षांच्या पिंजर्‍यापाशी आपण पोहोचतो. येथेच चहापान-खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी एक लहानुले उपहारगृह आहे. वाटेतील ही शेवटची अन्नाची सोय. ह्या उपहारगृहाच्या मागे उजवीकडून पुढे डावीकडून वळलेली वाट आपल्याला दाट रानातून सोंडेने अगदी किल्ल्यापर्यंत नेऊन पोहोचवते. उपहारगृहाकडून इतरही वाटा (ट्रेल्स) किल्ल्यापर्यंत जातात पण त्या सर्वज्ञात नाहीत. पहिल्या वाटेने किल्ल्याशी पोहोचायला दोन तास लागतात.

किल्ल्याच्या सुरुवातीला कर्णाईमातेची ३ फुटी मूर्ती प्रसन्नवदनी आहे. त्याच्यापुढे एक ८-१० फुटी कातळाचा टप्पा लागतो. सोपा असणारा हा कातळटप्पासुद्धा पार न करता आल्यामुळे किल्ल्यावर न जाता परतणारे “ट्रेकर्स” आम्ही पहिले आहेत.

पुढे ५-१० मिनिटे कातळात खोदलेल्या पायऱ्याच पार कराव्या लागतात आणि त्याच वेळेला किल्ल्याला वेढलेली तटबंदी दिसत राहते. २०-२५ फुटी कातळावरील उत्तम पायऱ्या पार केल्यावर गडाचा ६-७ फुटी पहिला दरवाजा – महादरवाजा लागतो. महादरवाज्यातून डावीकडेच उत्तम बांधणीच्या खणखणीत दरवाज्यातून वर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या उत्तर माचीत नेतात. वर पोहोचताच लिंगोबाचा डोंगर म्हणजेच कर्नाळयाचा सुळका भेदक दर्शन देतो. यौवनांकडून मिळवलेल्या ह्या किल्ल्याची किल्लेदारी शिवाजी महाराजांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बलवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके यांना दिली होती अशा उल्लेखाचा फलक येथे लावला आहे. जवळच किल्ल्याचे बरेच अवशेष आहेत. समोर गेल्यावर अवघा ३०-३५ मीटर उंचीचा सरळसोट सुळका येतो. सुळक्याच्या पोटात पाण्याची बरीच टाकी आहेत. जवळ-जवळ सगळ्याच टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे. सुळक्यावर आग्यामाशींची अनेक पोळी लटकलेली दिसतात. सुळक्याच्या पूर्वेकडील (गिर्यारोहकांच्या अपघाताच्या फलकाजवळ) टाक्याजवळून सुळक्यावर जाण्याचा मार्ग आहे (कृपया सूचना पहा). अनुभवाशिवाय त्यावर चढाईचा प्रयत्न करू नये. सुळक्याच्या पायथ्याला प्रदक्षिणा मात्र घालता येते. किल्ल्याच्या मागील बाजूस दुसरी माची आहे. या माचीच्या मधल्या एक दरवाज्यावर दोन्ही बाजूला व्याघ्र शिल्पे कोरलेली आहेत. किल्ल्यावरून पश्चिम दिशेला ढाकचा किल्ला सहजच दिसून येतो. तसेच प्रबळ, कलावंतीण, माणिकगड, मलंगगड आदी किल्ले काही अंशी दिसून येतात. संपूर्ण किल्ला फिरायला एक-दोन तास पुरेसे आहेत.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला तसे पाहता एका दिवसात पाहून होण्यासारखा असल्याकारणाने तेथे राहण्याची व त्यामुळेच निवाऱ्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीसुद्धा राहायचे झाल्यास पायथ्याच्या उपहारगृहाजवळ तात्पुरता निवारा उपलब्ध होऊ शकतो अन्यथा पनवेल बसस्थानकावर रात्र काढावी.

जेवण: किल्ल्यावर कोठेही अन्नाची सोय नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत. अभयारण्यातील पक्ष्या-प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ असणाऱ्या लहानशा उपहारगृहात चहा-नाश्त्याची सोय होईल. पनवेलमध्ये अनेक चांगली उपहारगृहे उपलब्ध होतील

पाणी: किल्ल्यावर पाण्याची टाकी आहेत, अथवा अभयारण्यातील पक्ष्या-प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ असणाऱ्या लहानशा उपहारगृहातून पाणी भरून घ्यावे.

सूचना :

आग्यामाशी ही मधमाश्यांमधील मोठी माशी आहे, साहजिकच तिचा दंश ही तितकाच त्रासदायक असतो. प्रसंगी वेदनांनी मृत्युमुखी पडण्याची वेळी येऊ शकते. अशा आग्यामाशींची प्रचंड पोळी कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्यावर आहेत त्यामुळे त्यावर चढताना घसारा, माश्यांचा धोका पत्करावा लागतो. अनुभव तसेच पुरेश्या साधनांशिवाय चढाईचा प्रयत्न करू नये.

छायाचित्रे :

 • karnala-01
 • karnala-02
 • karnala-03
 • karnala-04
 • karnala-05
 • karnala-06
 • karnala-08
 • karnala-09
 • karnala-10
 • karnala-11
 • karnala-12
 • karnala-13
 • karnala-14
 • karnala-15
 • karnala-16
 • karnala-17

Simple Image Gallery Extended