User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 
लोहगड
जिल्हा : पुणे उंची : ३४१२ फुट
तालुका : मावळ प्रकार : गिरीदुर्ग
परिसर : मळवली  ऋतू : सर्व
स्थळ : लोहगडवाडी श्रेणी : सोपी – ३
डोंगररांग : लोणावळा भटकंती : उत्कृष्ठ

प्रवास :

काही किल्ल्यांचा नुसता उल्लेख केल्यावरही तिथे जाण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही; आणि त्यात तो किल्ला जर जनमानसात प्रसिध्द असेल तर तत्काळ तेथे मोहीम आखली जाते. लोहगड हा एक असाच प्रसिध्द किल्ला. लोहगड हा नावाला ‘सार्थ’ करणारा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पहावाच असाच आहे. अनेक गिर्यारोहींच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी हा किल्ला सर केलेलाच असतो.

मुंबई - पुणे महामार्गावरुन जाताना मळवली रेल्वेस्थानकाच्या शेजारी डावीकडे दक्षिणेला आवळे-जावळे डोंगर लक्ष वेधून घेतात. त्यातील पश्चिमेचा (अलीकडील) डोंगर म्हणजे किल्ले लोहगड. पुणे जिल्ह्यात मळवली रेल्वेस्थानकाहून काही अंतरावर असणाऱ्या भाजे गावाजवळ लोहगड उभा आहे. लोहगडच्या पायथ्याशी लोहगडवाडी गाव वसले आहे.

मुंबईहून लोहगडाला येण्यासाठी मळवली हे रेल्वेस्थानक सर्वात जवळचे आहे. एस.टी.ने यावयाचे झाल्यास प्रथम लोणावळा येथे येऊन पुढे पुणे लोकल ट्रेनने मळवली स्थानक गाठावे. मळवली स्थानकातून महामार्गावरील पूल पार करून पलीकडे यावे आणि तेथून (उजवीकडे) भाजे गावाच्या दिशेने चालण्यास सुरुवात करावी. रेल्वेने किंवा एस.टी.ने लोहगडला यावयाचे झाल्यास गडावर जाण्याचा एकमेव छोटा मार्ग आहे. त्यामुळे मळवली स्थानकाहूनच ट्रेकला सुरुवात होते. भाजे गावातून लेण्याच्या खालून उत्तम रस्ता गडावर जाण्यासाठी आपली साथ देतो. स्वतःच्या वाहनाने येणाऱ्यांसाठी अगदी लोहगडवाडी पर्यंत गाडीने येता येते. हल्ली काही स्थानिक रिक्षा / जीपवाले मळवली स्थानकापासून अगदी लोहगडवाडी पर्यंत गाडीने सोडतात.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

भाजे गावातून नव्याने बांधलेल्या रस्त्याने तास – दीड तासांत लोहगड – विसापूर किल्ल्यांमधल्या खिंडीत पोहोचतो. ह्या खिंडीला ‘गायमुख खिंड’ असे म्हणतात. पूर्वी ही खिंड मोकळी होती. मात्र आता कोणीतरी इथे काही इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या खिंडीचे ऐतिहासिक महत्व गमावणार आहे. ह्या खिंडीतून डावीकडे विसापूर तर उजवीकडून लोहगडाकडे कूच करावे. गायमुख खिंडीतून आपण ५ मिनिटात लोहगडवाडीत पोहोचतो. येताना वाटेत काही ‘स्मृतीशिळा’ दिसून येतात. उजवीकडे लोहगडाच्या टोकाला आरपार खिंडार दिसून येतं. या भौगोलिक रचनेला ‘नेढं’ म्हणतात. लोहगडवाडीत काही घरांची दाटी दिसून येते. रस्त्याच्या कडेला आता काही गावकऱ्यांनी उपहारगृहे थाटली आहेत. येथे चहा-नाश्ता-जेवण्या-खाण्याची उत्तम सोय केली जाते. रात्रीच्या मुक्कामासाठी गावकऱ्यांच्या घरांतून ‘होम-स्टे’चा पर्यायही उपलब्ध आहे.

उजवीकडे झाडावळीतून उत्तम पायऱ्यांच्या साह्याने किल्ला चढायला सुरुवात करावी. १० मिनिटांत आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ पोहोचतो. ह्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस श्री गणेशाच्या प्रतिमा कोरल्या आहेत. कदाचित त्यामुळे ह्या दरवाज्याला ‘गणेश दरवाजा’ असे म्हणतात. त्यानंतर नागमोडी वळणे घेत, क्रमाने नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा, असे तीन दरवाजे पार करावे लागतात. म्हणजेच लोहगडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला चार दरवाजांची मालिका पार केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. हे सगळे दरवाजे आणि या भागातील तटबंदी उत्तम स्थितीत आहे आणि त्यावरून किल्ल्याच्या लोखंडासारख्या मजबूत संरक्षण व्यवस्थेची कल्पना येते आणि किल्ल्याला लोहगड हे नाव कसे पडले याचा अंदाज येतो.

गणेश दरवाज्यातून प्रवेश केल्यावर उजवीकडे बुरुजातील पहारेकऱ्यांच्या विश्रांतीची खोली दिसून येते. जवळच एक शिलालेख आहे. महादरवाजा हा गडाचा मुख्य आणि मूळ दरवाजा असून इतर नाना फडणवीसांनी बांधले आहेत असे या शिलालेखावरून कळून येते. येथेच गडावरील काही तोफा रचून ठेवण्यात आल्या आहेत. नारायण दरवाजा आणि हनुमान दरवाजा यांमधील वाटेवर कातळात दोन मोठी गुहा-वजा-कोठारे कोरलेली आढळतात. ही धान्य साठवण्याची जागा होती असा अंदाज आहे. दरवाज्यांच्या बुरुजांमध्ये शौचकूप आणि कोनाडे केलेले आढळतात. लोहगडवाडीतून अवघ्या २०-३० मिनिटांमध्ये आपण महादरवाज्यामध्ये येऊन दखल होतो. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने येथे खात्याचे नियम आणि अटी लागू होतात. खात्यतर्फे गणेश दरवाजा आणि महादरवाजा यांचे लाकडी दरवाजे नव्याने बनवून घेतले आहेत. चंगळवादी पर्यटकांवर आळा घालण्यासाठी लोहगड किल्ल्याचे दरवाजे सकाळी ९ वाजता उघडतात आणि संध्याकाळी ५:३० वाजता बंद करतात, यांची नोंद घ्यावी.

महादरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडून किल्ल्याच्या पठारावर प्रवेश होतो. महादरवाज्याच्या बुरुजांवरून खाली पाहिल्यावर किल्ल्याच्या दरवाज्यांची साखळी उत्तम दर्शन देते. पठारावर समोर निशाणाचा झेंडा, भान तोफ, मशीदसदृश्य इमारत (औरंगजेबाच्या मुलीची कबर?) नजरेस पडतात. मशिदीच्याच बाजूला उत्तर भागात लक्ष्मी कोठी नावाची खडकात खोदलेली गुहा आहे. चांगली ७० फुट लांब आणि ५० फुट रुंद असलेली ती गुहा म्हणजे सदर किंवा धान्याचे गोदाम असावी असा अंदाज बांधला जातो. त्यापुढे त्रिंबकेश्वर महादेवाचे नव्याने बांधलेले देऊळ, नंदी आणि हनुमानाची देवळी (घुमटी) दिसून येते. जवळच अष्टकोनी हौद (पाण्याचे टाके) आहे. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे. किल्ल्याच्या मध्यभागी लहानशी टेकडी आहे. तिच्या उत्तर भागात, मध्यभागी एक बसकी गुहा आहे. आज ती बुजली आहे; मात्र पूर्वी तिच्यात लोमेश ऋषींचे वास्तव्य होते असे मानले जाते. त्यापुढे शेखसल्ल्याच्या थडग्याची इमारत आहे. किल्ल्याच्या टेकडीवर एक मोठा तलाव आहे. शेजारीच किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत.

लोहगड किल्ल्याची ओळख प्रस्तापित करणारा भाग म्हणजेच गडावरील पश्चिमेस असणारा प्रेक्षणीय ‘विचूकाटा’. काही ठिकाणी त्याचा उल्लेख ‘विंचूकडा’ असाही आढळतो. विंचूकाटा ही खरंतर गडाला लाभलेली अंदाजे १५०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद असणारी एक नैसर्गिक दगडी भिंतच आहे. ही सोंड मूळ डोंगरापेक्षा खालच्या पातळीवर असल्याने येथे जाण्यासाठी एक टप्पा खाली उतरून जावे लागते. वरचा डोंगर जिथे संपतो तेथेच खाली उतरण्यासाठी लहानसा कातळटप्पा (रॉक-पॅच) आहे, तिथून खाली उतरून विंचूकाट्यावर जाता येते. ही संपूर्ण भिंत चिलखती तटबंदी घालून सुरक्षित केली आहे. तिच्या (पश्चिम) टोकाला चिलखती बुरुज बांधला आहे. ज्याच्या बाहेरील तटावर जाण्यासाठी आतल्या बाजूने दरवाजे आहेत.

याशिवाय किल्ल्यावर अनेक उद्धवस्त अवशेष आहेत, पाण्याची बुजलेली अनेक टाकी आहेत. किल्ला संपूर्णपणे नीट पाहण्यासाठी साधारणपणे अडीच-तीन तास पुरेसे होतात.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला एका दिवसांत पाहून होत असल्याने निवाऱ्याची गरज नाही. तरीसुद्धा राहायचे झाल्यास लोहगडवाडीत भाड्याने ‘होम-स्टे’ उपलब्ध होईल. अन्यथा त्यासाठी थेट लोणावळा गाठावे.

जेवण: किल्ल्यावर कोठेही अन्नाची सोय नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत. मळवली रेल्वेस्थानक, भाजे गाव तसेच लोहगडवाडीत उत्तम उपहारगृहे उपलब्ध आहेत.

पाणी: किल्ल्यावर पाण्याची टाकी आहेत, अथवा लोहगडवाडीतून पाणी विकत घेता येईल.

सूचना :

किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने येथे खात्याच्या नियम व अटी लागू होतात. चंगळवादी पर्यटकांवर आळा घालण्यासाठी लोहगड किल्ल्याचे दरवाजे सकाळी ९: वाजता उघडतात आणि संध्याकाळी ५:३० वाजता बंद करतात. त्यामुळे त्यानुसार किल्ल्याची भ्रमंती आखावी. ह्या वेळा बदलल्या जाऊ शकतात ह्याचीही नोंद घ्यावी.

छायाचित्रे :

 • lohagad-01
 • lohagad-02
 • lohagad-03
 • lohagad-04
 • lohagad-05
 • lohagad-06
 • lohagad-07
 • lohagad-08
 • lohagad-09
 • lohagad-10
 • lohagad-11
 • lohagad-12
 • lohagad-13
 • lohagad-14
 • lohagad-15
 • lohagad-16
 • lohagad-17
 • lohagad-18
 • lohagad-19
 • lohagad-20

Simple Image Gallery Extended