User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
कोरीगड
जिल्हा : पुणे उंची : २७८७ फुट
तालुका : मावळ प्रकार : गिरीदुर्ग
परिसर : लोणावळा  ऋतू : सर्व
स्थळ : पेठ शहापूर श्रेणी : सोपी – २
डोंगररांग : लोणावळा भटकंती : उत्कृष्ठ

प्रवास :

‘सहारा अँम्बी व्हॅली’ – हे नाव न ऐकलेला मुंबई-पुण्याचा माणूस विरळा. पण कोरीगड / कोराईगड हे किल्ल्याचे नाव ऐकलेला माणूसही विरळाच. ‘अँम्बी व्हॅली’ आणि कोराईगड ह्याचं जवळचं नातं आहे. खरेतर, कोराईगडाच्या पायथ्याशी ‘अँम्बी व्हॅली’ हे शहर वसवलेल आहे. अनेकजण ‘अँम्बी व्हॅली’ ला भेट देतात आणि त्यादरम्यान या किल्ल्याकडे कौतुकाने पाहतात. कोराईगडाला कोरीगड, शहगड या नावांनीही ओळखले जाते. कोराईगड हा पुण्यात लोणावळ्याजवळ आहे.

ह्या किल्ल्यावर येण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेला जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडीने पेठ शहापूर या गावी उतरावे. पेठ शहापूर गावातून समोरच किल्ला तर रस्त्याच्या उजव्या बाजूला काही घरे दिसून येतात. पेठ शहापूर गावातून कोराईगडाचे उत्तम दर्शन होते. किल्ल्याची मळलेली सोपी वाट किल्ल्याच्या पूर्वेकडून आहे. त्यासाठी पेठ शहापूर गावातून किल्ला उजवीकडे ठेऊन मळलेल्या पायवाटेने चालत गेल्यास अर्ध्या-पाऊण तासांत आपण किल्ल्याच्या पायऱ्यांशी येतो.

किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पेठ शहापूर गावाच्या पुढे असणाऱ्या आंबवणे गावातूनही दुसरी वाट आहे पण ती थोडी अवघड असून जास्त वापरात नाही.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

पेठ शहापूरच्या पायवाटेने आपण अर्धा-पाऊण तासांतच किल्ल्याच्या पायऱ्यांवरपाशी पोहोचतो. ठराविक अंतरावर ‘अँम्बी व्हॅली’ प्रकल्पाने किल्ल्यावर प्रकाश फेकण्यासाठी लावलेल्या विद्युत दिव्यांचे खांब दिसून येतात. अलीकडेच बांधलेल्या नवीन पायऱ्यांच्या अधून-मधून गडाच्या मुख्य पायऱ्या दिसून येतात. दहा मिनिटांमध्ये आपण उजव्या कडयाच्या पोटात कोरलेल्या एक गुहासदृश्य कोठार दिसून येते. गुहेत पाहण्यासाठी नऊ पायऱ्या चढून जाव्या लागतात. गावातील एखाद्या घराप्रमाणे तिला उंबरठा, ओसरी, खिडकी आहे. गुहेला लागूनच गणपतीची मूर्ती असलेले छोटेखानी मंदिर आहे.

इथून पुढे चढण सुरु होते. घळीत पायऱ्या खोडून बनविलेला मार्ग लक्षात येतो. या वाटेने किल्ल्याच्या गणेश दरवाज्यापर्यंत पोहोचण्यासाठी वीस-पंचवीस मिनिटे लागतात. वाटेत दोन ठिकाणी कातळात खोदलेले कोनाडे आढळतात. यापैकी सुरुवातीच्या कोनाडयात पाण्याचे टाके आहे. बहुदा पहारेकऱ्यांच्या विश्रांतीसाठी या जागा कोद्ल्या गेल्या असाव्यात. गणेश दरवाजा हा गोमुखी बांधणीचा लढाऊ रचनेचा असून आजही त्याची मजबुती थक्क करणारी आहे.

गणेश दरवाज्यातून आत शिरताच किल्ल्याचा प्रचंड विस्तार दिसून येतो. गडमाथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. गणेश दरवाज्यापासून काही अंतरावर दोन मोठी व एक लहान अशी एकूण तीन तली आहेत. या तळ्यांमध्ये स्पंज जातीचे प्राणी दिसून येत्क़त. तळयाला लागूनच एक शंकरचे देऊळ आहे. त्यासमोर भग्नावस्थेतील नंदी आहे. गडाची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या कोराईमातेचे देऊळ हे किल्ल्यावरील एक प्रमुख स्थान आहे. चार-पाच फुट उंच असलेली कोराईमातेची मूर्ती चार्भूजाचारी असून चारही हातांमध्ये तीन शस्त्रे धारण केली आहेत. देवळात गणेशाच्या आणि इतर देवतांच्या काही मूर्तीसुद्धा आहेत. भग्नावस्थेत असणाऱ्या या मूर्ती भाविकांनी कोराईमातेच्या देवळात एकत्र आणल्याचे कळून येते. या मुर्त्यांमध्ये शंख-चक्र-पद्म-गधाधारी श्री विष्णू ची मूर्ती आहे.

गडावर एकूण सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी ‘लक्ष्मी’ तोफ कोराईमातेच्या देवळापाशी आहे. याशिवाय काही वाडयाचे उध्वस्त अवशेष, छोटेखानी गुहा व त्यांजवळचे गणेश टाके गडावर आहेत.

संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी साधारण दोन - अडीच तास पुरेसे आहेत. किल्ल्यावरून माथेरान, तूंग, तिकोना, प्रबळगड, कलावंतीणदुर्ग, माणिकगड, कर्नाळा इत्यादी परिसर दिसून येतो.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला तसे पाहता एका दिवसात पाहून होण्यासारखा असल्याकारणाने तेथे राहण्याची व त्यामुळेच निवाऱ्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीसुद्धा राहायचे झाल्यास किल्ल्यावर शंकराच्या किंवा कोराईमातेच्या देवळात तात्पुरता निवारा उपलब्ध होऊ शकतो अन्यथा पायथ्याच्या पेठ शहापूर गावात गावकऱ्यांच्या घरात विनंती करून राहण्याची सोय होईल. लोणावळा येथे राहण्यासाठी उत्तम विश्रांतीगृहे उपलब्ध आहेत.

जेवण: किल्यावर कोठेही अन्नाची सोय नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत. पायथ्याच्या पेठ शहापूर गावात रस्त्याजवळ असणाऱ्या उपहारगृहात आगाऊ सूचनेने चहा-नाश्त्याची सोय होईल. लोणावळ्यामधे अनेक चांगली उपहारगृहे उपलब्ध होतील.

पाणी: किल्ल्यावर पाण्याची तळी-टाकी आहेत, परंतु पाणी पिण्यायोग्य नाही. गणेशदरवाज्याच्या अलीकडे वाटेत असणाऱ्या टाक्यातील पाणी वापरता येईल. अथवा पायथ्याच्या गावातून किंवा उपहारगृहातून पाणी भरून घ्यावे.

सूचना :

किल्ल्यावर काळ्या विंचवाची वस्ती आढळून येते त्यामुळे किल्ल्यावर मुक्काम व करणे योग्य. पावसाळ्यात किल्ल्यावर प्रचंड धुके असते त्यामुळे तलावात पाय घसरून पडल्यास जीविताचा धोका आहे.

छायाचित्रे :

 • korigad-01
 • korigad-02
 • korigad-03
 • korigad-04
 • korigad-05
 • korigad-06
 • korigad-07
 • korigad-08
 • korigad-09
 • korigad-10
 • korigad-11
 • korigad-12
 • korigad-13
 • korigad-14
 • korigad-15
 • korigad-16

Simple Image Gallery Extended