User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
कोथळीगड
जिल्हा : रायगड उंची : १४१६ फुट
तालुका : कर्जत प्रकार : गिरीदुर्ग
परिसर : कर्जत ऋतू : सर्व
स्थळ : आंबिवली / पेठ श्रेणी : सोपी – ३
डोंगररांग : कर्जत भटकंती : उत्कृष्ठ

प्रवास :

‘थम्स अप’ – या शीतपेयाचे चिन्ह म्हणजे मुठ आवळून वर केलेला अंगठा. अगदी याच चिन्हाची आठवण करून देणारा किल्ला म्हणजे किल्ले कोथळीगड. यास कोथळा, पेठचा किल्ला असेही म्हणतात. तर, कोथळीगडास जवळ करण्यासाठी आपल्याला कर्जत गाठावे लागते. कर्जतहून ‘आंबिवली’ येथे येण्यासाठी आपल्याला राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडया किंवा स्थानिक सहाआसनी रिक्शाही आहेत. अंदाजे पाऊण एक तासात आपण आंबिवली येथे पोहोचतो. बसगाडी जेथे सोडते ते ठिकाण म्हणजे एकमेव घर असलेली जागा. हे म्हणजेच आंबिवलीचे ‘कोतळा’ उपहारगृह. या उपहारगृहाकडून उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला कोथळीगडाकडे घेऊन जातो. या रस्त्यावरून जाताना एक १०-१५ मिनिटांत एक फाटा फुटतो. या फटयात डावीकडची वाट धरावी जी आपल्याला थेट पेठ गावातून कोथळीगडावर घेऊन जाते. अंदाजे दोन-अडीच तासात आंबिवली गावातून पेठ गावात पोहोचतो. या गावातून सुळक्याला डावीकडून वळस घेत पाऊण-एक तासात गडमाथा गाठावा.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

किल्ल्याच्या कातळकडयाला डावीकडून वळसा घालून बऱ्यापैकी मळलेल्या वाटेने सुळका चढायला सुरुवात करावी. चढाई आपल्याला किल्ल्याच्या मागील बाजूस घेऊन जातेय अस वाटत राहतं. याच वाटेत झुडूपात गुडूप झालेल्या किल्ल्याचं पहिलं (?) प्रवेशद्वार (?) लागतं. यानंतर अचानक पुन्हा मागून वर जाणारी वाट आपल्याला गडाच्या महादरवाज्याजवळ पोहोचवते. दरवाज्याची कमान कोसळली आहे आणि पायऱ्याही उध्वस्त झालेल्या आहेत. पुढे उजवीकडून वर जाताच कातळात खोदलेल्या प्रशस्त गुहा सामोऱ्या येतात. अगदी २०-३० जण अगदी आरामात राहतील इतक्या या गुहा मोठया आहेत. गुहांमध्य कोरीवकाम केलेले स्तंभ आणि कोनाडे आहेत.

गुहांकडून मागे आल्यावर उत्तर टोकाला एक तोफ बसवलेली आहे. या टोकावरून सुळक्याचा भाग अंगावर आल्यासारखा भासतो. येथे सुळक्याशी बांधकाम करून त्यास बुरुजासारखा आकार देण्यात आला आहे. सुळक्याच्या पश्चिम बाजूला (मागील बाजूस) पाण्याची दोन टाकी आहेत.

गुहांकडून थोडे मागे सुळक्याच्या आतून ऊर्ध्वमुखी भुयारातून किल्ल्यावर जाण्यासाठी उत्तम पायऱ्या खोदलेल्या आहेत. माथ्यावर अगदी नावाला उरलेले बांधकाम आणि एक छोटा हौद आहे. ह्या हौदाचे पाणी शुद्ध करून वापरू शकतो.

माथ्यावरून दोन-अडीच तास चालत आलेलो डोंगर दिसतो. पूर्वेला पदरगड, नागफणी इत्यादी परिसर दिसून येतो.

संपूर्ण किल्ला पाहायला एक दोन तास पुरेसे आहेत.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला तसे पाहता एका दिवसात पाहून होण्यासारखा असल्याकारणाने तेथे राहण्याची व त्यामुळेच निवाऱ्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीसुद्धा राहायचे झाल्यास किल्ल्यावरील गुहेमध्ये कोणत्याही ऋतूत आरामात राहता येईल. पेठवाडीतसुद्धा आगाऊ सूचनेने एखाद्या गावकऱ्याकडे राहण्याची सोय होऊ शकते. अन्यथा कर्जत बसस्थानकावर रात्र काढावी.

जेवण: किल्ल्यावर कोठेही अन्नाची सोय नाही. खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत. पेठवाडीत असणाऱ्या लहानशा उपहारगृहात चहा-नाश्त्याची सोय होईल. कर्जतमध्ये अनेक चांगली उपहारगृहे उपलब्ध होतील.

पाणी: किल्ल्यावर पाण्याची टाकी आहेत, अथवा पेठवाडीत असणाऱ्या लहानशा उपहारगृहातून पाणी भरून घ्यावे.

सूचना :

किल्ल्याची वाट दमछाक करणारी असून वाटेत कोठेही पाण्याची उपलब्धता नाही त्यामुळे पुरेसे पाणी जवळ बाळगणे आवश्यक आहे.

छायाचित्रे :

  • kothaligad-01
  • kothaligad-02
  • kothaligad-03
  • kothaligad-04
  • kothaligad-05
  • kothaligad-06

Simple Image Gallery Extended