User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
कुलाबा
जिल्हा : रायगड उंची : लागू नाही
तालुका : अलिबाग प्रकार : जलदुर्ग
परिसर : अलिबाग ऋतू : सर्व
स्थळ : अलिबाग समुद्रतट श्रेणी : सोपी – १
डोंगररांग : लागू नाही भटकंती : उत्कृष्ठ

प्रवास :

कुलाबा म्हणजेच अलिबागचा जलदुर्ग.. चौल, अक्षी, नागांव, अलिबाग, साखर, थळ, आवास आणि किहीम ही अलिबाग जिल्ह्यातील आठ प्रमुख आगारे म्हणजे बागायती गावं. ही गावं म्हणजे अष्टागारे तर कुलाबा किल्ला हा अष्टागारांचा स्वामीच. मुंबईच्या जवळ असल्याने टोपीकर इंग्रजांना या किल्ल्याची जबरदस्त जरब होती. ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी प्रथम अलिबागला यावे लागते. अलिबाग हे तालुकास्थान आहे तसेच येथील समुद्रकिनारे प्रसिद्ध असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडयांची सोय उत्तम आहेच पण मुंबईहून येणाऱ्यांसाठी गेट-वे ऑफ इंडियाहून मोटारबोटीची सोय ही आहे.

अलिबाग किनाऱ्यापासून अवघे अर्धा किलोमीटरवर असणाऱ्या खडकावर हा किल्ला बांधला आहे. ओहोटीच्यावेळी चालत किल्ल्यास जाता येते. परंतू भरतीच्या वेळी किल्ल्यास जाता येत नाही. पर्यटनस्थळ असल्याकारणाने घोडे, घोडागाडया ही उपलब्ध होतात, भाडयाची बोलणी आधी करून त्यांची सोयही वापरता येईल.

किल्ल्यास लागून सर्जेकोट नावाचा उपदुर्ग तर अलिबाग किनाऱ्यावर हिराकोट हे किल्ले आहेत.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

शिवाजी महाराजांचा प्रत्येक किल्ला हा दुर्ग बांधणीचा एक-एक प्रयोग होता.. सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी शिश्याचा तळ, कांसा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्यासाठी वापरलेला चुना हे महाराजांचे प्रयोग सर्वज्ञात आहेत. ह्या किल्ल्यासाठीही असाच एक प्रयोग वापरण्यात आला आहे. प्रचंड प्रस्तर एकमेकांवर चुन्याशिवाय रचून या किल्ल्याची बांधणी झाली आहे. तसे पाहता अलिबाग हा किल्ला पुरातन आहे. महाराजांनी त्याची डागडुजी करून त्यास अधिक भक्कम केले.

किल्ल्यापाशी पोहोचेपर्यंत आपल्याला तो बसका वाटत राहतो पण प्रत्यक्ष किल्ल्यापाशी पोहोचताच २०-२५ फुटांची तटबंदी आपल्याला त्याच्या भक्कमपणाची जाणिव करून देते. उजव्या बाजूलाच दोन भरभक्कम बुरुजांनी बंदिस्त ईशान्यामुखी प्रवेशद्वार लागते. प्रवेद्वाराच्या कमानीवर श्री गणेशाची प्रतिमा असून, कमळ फुले, हत्ती, हरण, शरभ इत्यादी नक्षीकाम दिसून येते. प्रवेशद्वाराने किल्ल्यात शिरताच नव्याने उभारलेले महाराष्ट्र शासनाचे तिकीटघर आहे. किल्ला पाहण्यासाठी येथे माफक शुल्क भरावे लागते, त्याचा वापर किल्ल्याच्या डागडुजीसाठी करण्यात येत असावा. येथून किल्ला पाहण्यासाठी डावीकडे जावे लागते. जवळच काही देवतांच्या छोटया देवळ्या आहेत. त्यापैकी पद्मावतीची एक मूर्ती अतिभग्न अवस्थेत असून दुसरी महिषासुरमर्दिनीची आहे. चार भुजा असणाऱ्या या मूर्तीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे. मागील उजव्या हाताने तिने रेडयाची (महिषासुराची) शेपटी पकडली आहे. डाव्या हातात रेडयाची जीभ असून डाव्या मागच्या हातात परळ आहे.

येथून पुढे किल्ल्यात राजवाडे, पागा, कोठया, कचेऱ्या इत्यादींचे अवशेष दिसून येतात. किल्ल्यात अंधार बाव नाव्वाची भुयारी विहीर आणि दोन-तीन विहिरी दिसून येतात. जवळच तटामधे एका भुयारात त्याकाळच्या शौचालयाची सोय केलेली आढळून येते. या अवशेषांवरून ही किल्ल्याच्या त्यावेळच्या संपन्नतेची आणि प्रचंडतेची कल्पना करता येते.

गडावर आजमितीस सुस्थितीस असणाऱ्या अशा फक्त दोनच वास्तू आहेत. त्या म्हणजे सिद्धिविनायक गणेश पंचायतन मंदिर आणि त्यासमोरील पुष्कर्णी. मंदिराच्या प्राकारात भव्य दिपमाळ, हनुमंताची घुमटी, तुळशी वृंदावन, महादेवाचे मंदिर आहेत. समोर असणारी पुष्कर्णी गोडया पाण्याची असून तिला भव्य असे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराजवळच पुष्कर्णी मध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पुष्कर्णीला अजून एक लहानसे द्वार असून त्याला लागूनच असणाऱ्या घुमटीत सात आसरा देवता आहेत.

गडाला आणखी दोन दरवाजे असून एक भग्न झाला आहे. त्याखाली तळघर आहे. दुसरा दक्षिण दिशेला असून त्यास दर्या दरवाजा असे नाव आहे. दरवाजावर गणेश, हनुमान, गरुड या देवतांच्या मूर्ती आहेत तर कमळ, कीर्तिमुख, मगरी यांचे कोरीवकाम असलेली द्वारपट्टी आहे. किल्ल्यात दरवाज्याजवळ एक घुमटी आहे. दरवाज्याबाहेर ताटालगत कान्होजी आंग्र्यांच्या गोदीचे अवशेष आढळून येतात. इतरही काही ओळख पटवता न येणारे अवशेष आणि काही तोफा किल्ल्यात आहेत.

किल्ल्याच्या उत्तरेस थोडया अंतरावर एक सुटा गढी-वजा-किल्ला आहे. हा उप-दुर्ग किल्ल्याचाच भाग असून त्याला सर्जेकोट असे नाव आहे. मध्यभागी पाण्याची विहीर आणि भक्कम तट अशी याची रचना पाहून मुख्य किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेचा तो एक भाग होता हे जाणवते. तर एकूण सत्र भक्कम बुरुज असणारा कुलाबा किल्ला पाहण्यासाठी दोन-अडीच तास पुरेसे होतात.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला एका दिवसात पाहून होण्यासारखा असल्याकारणाने तेथे राहण्याची व त्यामुळेच निवाऱ्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीसुद्धा राहायचे झाल्यास अलिबाग गावात विश्रांतीगृहे किंवा खासगी निवाऱ्याची सोय होऊ शकते.

जेवण: अलिबाग समुद्रकिनारा प्रसिद्ध असल्याने बसथांब्यापासूनच उपहारगृहांची रांग लागते. पुरी-भाजी पासून अगदी नारळपाण्यापर्यंतची सोय येथे होते.

पाणी: किल्ल्यात विहीरीच्या पाण्याची सोय आहे. अलिबाग किनाऱ्यावर उपहारगृहांमध्ये पाण्याची व्यवस्था आहे.

सूचना :

कुलाबा किल्ला समुद्रात असल्याने भारती-ओहोटीच्या वेळा सांभाळून किल्ल्यात प्रवेश मिळतो. भरतीच्या वेळी किल्ल्यात प्रवेश करता येत नसून फक्त ओहोटीच्या वेळा किल्ल्यात पायी किंवा घोडागाडीने जाता येते. संध्याकाळी भरतीच्या आधी किल्ल्यातील अधिकारी प्रवाश्यांना किल्ल्याबाहेर पडण्यास भाग पाडतात याची नोंद घ्यावी.

छायाचित्रे :

 • kulaba-01
 • kulaba-02
 • kulaba-03
 • kulaba-04
 • kulaba-05
 • kulaba-06
 • kulaba-07
 • kulaba-08
 • kulaba-09
 • kulaba-10
 • kulaba-11
 • kulaba-12
 • kulaba-13
 • kulaba-14
 • kulaba-15
 • kulaba-16
 • kulaba-17
 • kulaba-18

Simple Image Gallery Extended