User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
कोर्लई
जिल्हा : रायगड उंची : २७२ फुट
तालुका : बोर्ली प्रकार : गिरीदुर्ग
परिसर : रेवदंडा ऋतू : सर्व
स्थळ : कोर्लई कोळीवाडा श्रेणी : सोपी – २
डोंगररांग : लागू नाही भटकंती : उत्तम

प्रवास :

अलिबाग – रेवदंडा ही स्थळे समुद्रप्रेमींसाठी काही नवीन नाहीत. येथील समुद्रकिनारे शांत व प्रेक्षणीय आहेत. गजबजाटाहून लांब असणाऱ्या ह्या समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटक आकर्षिले गेले नसते तरच नवल. पण गिर्यारोहक आणि गड-दुर्ग प्रेमींसाठी ही स्थळे तेवढीच आकर्षक आहेत. रेवदंडयाचा आगरकोट अनेकांना माहित असेल पण तिथून नैऋत्येला असणाऱ्या टेकडीवरील कोर्लई किल्ला मात्र अजूनही अपरिचितच.

मुंबईहून अधिक जवळ असणारे रेवदंडा हे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. या ठिकाणी येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडया आहेत. रेवदंडा बसस्थानकापासून कोर्लई गावात जाण्यासाठी बसगाड्या किंवा स्थानिक रिक्शा आहेत. तसे पाहता रेवदंडा कोर्लई गावापर्यंत पोहोचता येते. भाडयाने रिक्शा केल्यास भाडयाची बोलणी आधी करून घ्यावी. क्वचित रिक्षावाले अगदी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ही घेऊन जातात.

समुद्रकिनाऱ्याजवळ असल्याने गावात कोळी लोकांची वस्ती आहे. व या वस्तीतूनच किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. पायथ्याहून टेकडीच्या उजवीकडून नव्याने डागडुजी केलेली वाट आहे. डावीकडून समुद्राकडील जरा अवघड वाट आहे. कोणत्याही वाटेने जाण्यासाठी अर्धा-पाऊण तास लागतो.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

किल्ल्यावर प्रवेश होताच कोर्लई किल्ला टेकडीवरील चिंचोळ्या पठारावर उभारल्याने लक्षात येते. किल्ला हा फक्त लांबीला असून त्याला रुंदी अशी नाहीच. ८-१० मीटर रुंद हा किल्ला चांगल्या मजबूत तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. किल्ल्याला पूर्व पश्चिम दोन्ही बाजूंन प्रवेशद्वारे असून पूर्वेकडील प्रवेशद्वार हे किल्ल्याचे मुख्य द्वार असून पश्चिमेकडील द्वार हे समुद्रकिनाऱ्यावर ये-जा करण्यासाठी वापरात असावे. किल्लाच्या उत्तर भागात चिंचोळी माची असून तिला ‘क्रूसाची बातेरी’ किंवा 'सांताक्रूझ' म्हणतात. अगदी समुद्रात जाणाऱ्या या माचीवरून समुद्र आणि ईशान्येला रेवदंडयाचा आगरकोट यांचे सुरेख दर्शन घडते. माचीवरून पश्चिमेला होडयांसाठी धक्का बांधलेला दिसतो. या भागात पश्चिमेला एक दिपगृह बांधलेले आहे.

किल्ल्याला एकूण बारा बुरुज आहेत. किल्लाची टेकडी चारही बाजूंनी घसारायुक्त आहे पण तरीही त्यावरील बुरुज-तटबंदी पाहता किल्ल्याच्या संरक्षणावर त्यावेळी विशेष लक्ष देण्यात आले होते हे जाणवते. आजही किल्ल्यावर अनेक तोफा आढळतात. त्यापैकी दोन तोफांच्या शेवटी कुत्र्यांच्या डोक्यांची शिल्पे आहेत तर काहींवर पोर्तुगीज राजवटीचे राजचिन्ह दिसते. संपूर्ण किल्ल्यावर पोर्तुगीज शैलीचा प्रभाव आढळतो.

किल्ल्यावर दक्षिण बाजूस शंकराचे - रत्नेश्वराचे देऊळ, त्यासमोर तुळशी वृंदावन आहे. किल्ल्याच्या याच भागात पाण्याचे भूमिगत टाके आहे. त्यावर तीन चौकोनी तोंडे काढली असून आज सुद्धा त्या पाण्याचा वापर किल्ल्यावर केला जातो. बाष्पीभवन होऊन पाणी उडून जाऊ नये म्हणून हे टाके बंदिस्त केले आहे. यापुढील दक्षिण भागात दोन मजबूत बुरुजांमधल्या दरवाज्यावर पोर्तुगीज राजचिन्ह असलेले काही शिलालेख आढळतात. किल्ल्याच्या याच भागात एक पोर्तुगीज बांधणीचे चर्च आहे. त्यापुढे यज्ञकुंडासारखे एक चौरस बांधकाम आहे. त्याचे प्रयोजन कळून येत नाही. मुख्य पूर्व प्रवेशद्वारातून किल्ल्यातील याच भागात प्रवेश होतो. या पुढे असणाऱ्या दरवाज्याच्या बुरुजांमध्ये दारूकोठारे आढळतात. या दरवाज्यातून दक्षिणेकडे पोहोचताच किल्ल्याचा शेवटचा भाग दिसतो. येथे पश्चिम तटबंदीलगत एक देवळासारखे लहान बांधकाम दिसते. या किल्ल्याची तटबंदी दक्षिण टोकाकडे एखाद्या कात्रीच्या दोन टोकांप्रमाणे विभागली आहेत आणि त्यांचे प्रयोजन कळून येत नाही. या भागातून कोर्लई गाव दृष्टीक्षेपात येते.

किल्ल्यावरून सभोवताली सुरेख दृष्य दिसून येते. पूर्वेकडील खाडी, रेवदंडा - कोर्लई यांना जोडणारा त्या खाडीवरील पुन आणि खाणकामाचा प्रकल्प, पश्चिमेकडील विशाल समुद्र, उत्तरेकडील रेवदंडा परिसर, दक्षिणेकडील कोर्लई गावाचा परिसर अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी दीड-दोन तास पुरेसे होतात. रेवदंडा समुद्रकिनारा, आगरकोट आणि कोर्लई हे एका दिवसात पाहून होतात.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला तसे पाहता एकाच दिवसात पाहून होण्यासारखा असल्याकारणाने तेथे राहण्याची व त्यामुळेच निवाऱ्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीसुद्धा राहायचे झाल्यास किल्ल्याबाहेरील कोळी लोकांच्या वस्तीत अशी सोय होऊ शकते. रेवदंडा परिसरात विश्रांतीगृहे उपलब्ध होतील.

जेवण: किल्ल्यावर व कोर्लई गावात उपहारगृहे नाहीत. त्यामुळे खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत, अन्यथा रेवदंडा गावात अनेक चांगली उपहारगृहे उपलब्ध होतील.

पाणी: किल्ल्यावरील भूमिगत टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे.

सूचना :

लागू नाही.

छायाचित्रे :

 • korlai-01
 • korlai-02
 • korlai-03
 • korlai-04
 • korlai-05
 • korlai-06
 • korlai-07
 • korlai-08
 • korlai-09
 • korlai-10
 • korlai-11
 • korlai-12
 • korlai-13
 • korlai-14
 • korlai-15
 • korlai-16
 • korlai-17
 • korlai-18
 • korlai-19
 • korlai-20

Simple Image Gallery Extended