User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
घनगड
जिल्हा : पुणे उंची : २७३८ फुट
तालुका : मुळशी प्रकार : गिरीदुर्ग
परिसर : लोणावळा ऋतू : सर्व
स्थळ : येकोले श्रेणी : सोपी – ३
डोंगररांग : सुधागड भटकंती : उत्तम

प्रवास :

लोणावळ्याच्या पूर्वेकडे मावळ प्रांताचा एक भाग आहे. त्याचं नाव ‘कोरबारसं’. या भागात कोरीगड, तेलबैला, कैलासगड हे किल्ले आहेत. याच भागात आणखी एक भग्न व दुर्लक्षित किल्ला आहे – घनगड . ‘सहारा अँम्बी व्हॅली’, कोरीगड जवळ असूनही ह्या किल्ल्याचं नाव ऐकलेला माणूस क्वचितच. अनेक जण अँम्बी व्हॅलीला भेट देतात आणि त्यादरम्यान या किल्ल्यावर जाऊन येतात. लोणावळ्याहून पेठ शहापूर कडून पुढे एक रस्ता भांबुर्डे गावाकडे जातो. घाटवळणांची आठवण करून देणारा हा रस्ता एका लहानश्या जंगलातून जात्तो. उजवीकडे कावडीचा डोंगर म्हणजेच तेलबैलाची भिंत दिसते. जंगल संपताच उजवीकडे सुटा झालेला गांधीटोपीसारखा डोंगर म्हणजेच घनगड. भांबुर्डेकडे जाताना नवरा-नवरी सुळक्यांच्या अलीकडेच उजवीकडे जाणारी वाट आपल्याला ‘येकोले’ गावी घेऊन जाते. येकोले हेच घनगडाचे पायथ्याचे गावं. किल्ल्यावर जाण्यासाठी या गावातूनच वाट आहे.

ह्या किल्ल्यावर येण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेला जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडीने येकोले फाटयावर उतरावे. उजवीकडून वीस-पंचवीस मिनिटांमध्ये येकोले गावी पोहोचावे. गावातून समोरच किल्ला तर रस्त्याच्या उजव्या बाजूला काही घरे दिसून येतात. पायथ्याच्या झाडीतून किल्ल्याची मळलेली सोपी वाट किल्ल्याच्या पूर्वेकडून आहे. या वाटेने एक अर्ध्या-पाऊण तासांत आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो. स्वतःचे वाहन असल्यास येकोले गावापर्यंत थेट पोहोचता येते. गावात गावकऱ्यांच्या परवानगीने गाडीतळाची सोय होते.

(कृपया सूचना पहा)

माहिती :

येकोले गावातून डावीकडे झाडीतून घनगड दर्शन देत राहतो. याच वाटेने गडाकडे जाताना अधून मधून पायऱ्यांचे अवशेष दिसून येतात. या वाटेवर गारजाई देवीचे एक टुमदार देऊळ लागते. नव्याने जीर्णोद्धार (?) केलेल्या या देवळासमोर हनुमानाचे भग्न शिल्प, काही दीपमाळा, शेंदूर फासलेले दगड आहेत. देवळामध्ये चारभुजा धारी गारजाई देवीची दीड-दोन फुटी जीर्ण मूर्ती आहे. कोनाडयातही काही भग्न मूर्ती, दगड आहेत. देवळाच्या दरवाज्याबाहेर डावीकडे ‘श्री गारजाई महाराजाचा व किल्ले घनगडाचा’ ही अक्षरे असलेला पण आजमितीस अस्पष्ट झालेला शिलालेख आहे.

देवळापासून पुढे पायऱ्यांनी आपण घनगडाच्या खिंडीत पोहोचतो. खिंडीपलीकडे दगड रचून तयार झालेला (केलेला ?) एक लहानसा सुळका दिसतो. आजुबाजूची तटबंदी भग्न होऊन उरलेल्या अवशेषांमुळे तो तयार झाला असावा. घनगडाच्या डोंगराच्या कातळकडयात डावीकडे एक गुहा काढलेली आहे. या गुहेजवळ पोहोचताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. आधीच अरुंद असणारी वाट घसाऱ्यामुळे कठीण झाली आहे. पहारेकऱ्यांच्या विश्रांतीसाठी तिचा वापर होत असावा.

खिंडीकडून उजवीकडे आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. गोमुखी बांधणीचे प्रवेशद्वार दोन मजबूत बुरुजांनी संरक्षित केलेले आहे. दरवाज्यातून आत शिरताच खोदीव गुहांची जोडी दिसून येते. गडावरील शिबंदीच्या अन्न-धान्याचा साठा करण्यासाठी याचा वापर केला जात असावा. गुहांच्या उजवीकडे कातळकडयाचा कोसळलेला प्रचंड प्रस्तर उतारावर थबकलेला आढळून येतो. भिंतींशी वाटणाचा पाटा उभा केल्यासारखा तो दिसतो. त्याखालीच एका कोनाडयात वाघजाई देवीची मूर्ती आहे. येथून येकोले गावाचे सुरेख दृश्य दिसते. थोडे मागे मुळशी जलाशय दिसतो.

खोदीव गुहांच्या डावीकडे खडकात पायऱ्या खोदुन वाट केलेली असावी. किल्ल्याच्या वरील भागात जाणारी मूळ वाटही अशीच खोदुन काढलेली असावी पण इंग्रज आमदनी मध्ये सुरुंग लावून ती उध्वस्त केल्याने प्रस्तरारोहण करून ही वाट पार करावी लागत असे. १५-२० हा कडा पार करताना अत्यंत काळजी घ्यावी लागत असे. ३०-३५ फुटी दोराशिवाय या वाटेने जाणे धोकादायक होते. पण अलीकडेच एका दुर्गवेडया संस्थेने येथे लोखंडी शिडी लावून आपल्यासारख्या लोकांची सोय करून दिली आहे.

या वाटेने वर आल्यावर समोरच कोरीव गुहा आढळून येते तर उजवीकडे पाण्याचे टाके आहे. डावीकडे बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आहे. कातळकड्याशी झटी घेऊन पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून माथ्यावर पोहोचावे. माथ्यावर काही टाकी, उध्वस्त घरांचे अवशेष आणि मजबूत बुरुज आढळतात. माथ्यावरून पश्चिम दिशेला सुधागड व कोकणाचे तर वायव्य दिशेला तेलबैलाचे उत्कृष्ट दृश्य दिसून येते. संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी एक-दीड तास पुरेसा होतो.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला तसे पाहता एका दिवसात पाहून होण्यासारखा असल्याकारणाने तेथे राहण्याची व त्यामुळेच निवाऱ्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीसुद्धा राहायचे झाल्यास किल्ल्यावर गारजाईमातेच्या देवळात १५-२० जणांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध होऊ शकतो अन्यथा पायथ्याच्या येकोले गावात गावकऱ्यांच्या घरात किंवा पडवीमध्ये राहता येईल. लोणावळा येथे अनेक प्रकारची विश्रामगृहे उपलब्ध होतील.

जेवण: किल्ल्यावर कोठेही अन्नाची सोय नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत. पायथ्याच्या येकोले गावात आगाऊ सूचनेने चहा-नाश्ता-जेवणाची सोय होईल किंवा लोणावळ्यामध्ये उपहारगृहे उपलब्ध होतील.

पाणी: किल्ल्यावर पाणी नाही. पायथ्याच्या गावातून पाणी भरून घ्यावे.

सूचना :

किल्ल्यावर प्रचंड घसारा आहे तसेच काही ठिकाणचे दगड ठिसूळ झाले आहेत. संपूर्ण किल्ला चढता-उतरताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे.

छायाचित्रे :

 • ghangad-01
 • ghangad-02
 • ghangad-03
 • ghangad-04
 • ghangad-05
 • ghangad-06
 • ghangad-07
 • ghangad-08
 • ghangad-09
 • ghangad-10
 • ghangad-11
 • ghangad-12
 • ghangad-13
 • ghangad-14
 • ghangad-15
 • ghangad-16

Simple Image Gallery Extended