User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

प्रस्तरारोहणाची सुरुवात एखाद्या तज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करणे अत्यावश्यक आहे. ही कला शिकून वा सरावानेच आत्मसात करता येते. केवळ वाचनाने किंवा अनुकरणाने तीत प्राविण्य संपादन करणे कदापी शक्य नाही. त्यासाठी अधिकाधिक अभ्यास व सराव हाच एकमेव मार्ग आहे.

र्यारोहणात अनेकदा कातळटप्पे पार करावे लागतात. पण ते अधिकतम ३ ते ७ मीटर उंचीचे असतात. त्यापेक्षा अधिक उंचीचे कातळटप्पे आल्यास ते गिर्यारोहण न राहता प्रस्तरारोहण होते. असे कातळटप्पे आल्यावर अनेक गिर्यारोहींना आपले शूरत्व दाखविण्याचा मोह होतो आणि इथेच ते चूक करतात. त्यातील अनेकांना प्रस्तरारोहणाची साधी ओळखही नसते. इतर आरोहकही याला बळी पडतात आणि अपघाताचा प्रसंग ओढावून घेतात.

हल्ली अनेक गिर्यारोही संस्था प्रस्तरारोहणाच्या प्रा्थमिक आणि प्रगत अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांसहित शिकवणारी शिबिरे आयोजित करतात. अशा शिबिरांमध्ये या संस्था, अनेक नामांकित व मान्यवर प्रस्तरारोहींना प्रशिक्षक म्हणून आमंत्रित करतात. अशा प्रस्तरारोहींना प्रस्तरारोहण करताना नुसते पाहिल्यानेही बरेच काही शिकता येते. त्यामुळे अशा शिबिरांचा फायदा प्रस्तरारोहण शिकण्यासाठी नक्कीच होऊ शकतो.

शिक्षण घेऊन प्रस्तरारोहण तंत्र शिकता येते. परंतु त्यातील निपुणता मात्र व्यायाम आणि सरावावर अवलंबून आहे. हाता-पायांवर, बोटांवर देणे, घेणे, बोटांच्या आधारे शरीराचे वजन पेलणे, स्नायुंना ताण देणे, त्यांना लवचिक बनवणे, इत्यादी व्यायाम नियमित व योग्य प्रमाणात होणे प्रस्तरारोहण येण्यासाठी आवश्यक आहेत. आणि या सर्व गोष्टींनंतरही त्यातील यश ही बाब वैयक्तिक क्षमता, नियमित आणि सक्षम सहयोगी यांवर अवलंबून आहे.

प्रस्तरारोहणाच्या सुरुवातीसाठी जवळच्या परिसरातील खडक, प्रस्तरखंडांचा वापर करता येईल. त्यांची उंची ३ ते ७ मीटर असावी. यास इंग्रजीमध्ये ‘बोल्डरींग’ असे म्हणतात. त्यापेक्षा अधिक उंचीचे प्रस्तरखंड प्रगत सरावासाठी वापरावे. आजकाल सरावासाठी अनेक ठिकाणी ‘कृत्रिम प्रस्तरारोहण भिंती’ तयार केल्या जातात. आजूबाजूच्या परिसरात जर असे खडक नसतील तर अशा ठिकाणी कृत्रिम भिंतींवर सराव करावा.