User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

डोंगरयात्रेचे तंत्र-मंत्र? म्हणजे काय? डोंगरयात्रेत कसले आलेत तंत्र-मंत्र? हे सगळे प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण होय, डोंगरयात्रेतही तंत्र-मंत्र असतात. परंतु ते अगदी सामान्य असल्याने त्यांच्याकडे अनेकजण दुर्लक्ष्य करतात आणि मग अडचणीत सापडतात. त्यामुळे कोणतीही डोंगरयात्रा, मग ती लहान का असेना, सुरु करण्यापूर्वी हे तंत्र-मंत्र पाळले गेले पाहिजेत. आधी नमूद केल्याप्रमाणे डोंगरयात्रेत डोंगरयात्रेत डोंगरयात्रेचे ठिकाण ठरवण्यापासून ते निरोपाच्या ठिकाणी सुखरूप पोहोचेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे प्रत्येक डोंगरयात्रेपूर्वी आणि दरम्यान पुढील गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे व ह्या सर्व गोष्टीत नेत्याने कटाक्षाने वैयक्तिक लक्ष्य घालणे आवश्यक आहे.

इतर अनुभवी डोंगरयात्रींकडून किंवा संस्थांकडून ठरविलेल्या डोंगरयात्रेच्या, प्रार्थमिक यात्रेची माहिती, नोंदी, रेखाटने नमूद करून घ्याव्यात. उदा. सुरुवातीचे स्थळ, तेथून डोंगराच्या पायथ्याचे गाव व त्याचे सुरुवातीच्या स्थळापासूनचे अंतर, गावातील पोलीस पाटलांचे संपर्क, डोंगरावर जाणाऱ्या इतर वाटा, त्यातील सोप्या वाटा व कठीण वाटा, पायथा ते माथा अंतर (कि.मी. मध्ये अंतर, फूट किंवा मीटर मध्ये उंची, तासांमध्ये वेळ), पाणवठे (पिण्याच्या पाण्याचे वेगळे), जेवण / न्याहारी उपलब्ध होण्याच्या जागा, निवाऱ्याच्या जागा, माथ्यावरील निरीक्षणे (जसे किल्ल्याचे अवशेष, देवळे, गिरिस्थाने, गुहा, तलाव, टाकी, लेणी इत्यादी), रेखाचित्रे इत्यादी.

र्व नोंदी लक्षात घेऊन डोंगरयात्रेची श्रेणी ठरवावी व यात्रेत सहभागी होणारे सदस्य ह्या श्रेणीच्या यात्रा झेपवू शकणारे असेच निवडावेत. यात्रेची तयारीसुद्धा श्रेणीनुसारच करावी. सभासदांनी कधी, कसे, कुठे जमायचे ते ठरवावे. प्रत्येक सभासदाने, आवश्यक साहित्यासह, ठरल्याप्रमाणे गटसाहित्य अवश्य आणावे. त्यात कुचराई करू नये. याच विभागात पुढे प्रत्येक यात्रीने आणावयाचे आवश्यक (अनिवार्य) साहित्य व त्यांच्या उपयोगाची माहिती दिली आहे व किमान वैयक्तिक अनिवार्य साहित्य प्रत्येक यात्रेत सोबत आणणे हे प्रत्येक यात्रीची जबाबदारी आहे. यात्रेचा सुयोग्य नेता (लीडर) ठरवणे अत्यावश्यक आहे व तो यात्रेच्या सुरुवातीस जाहीर करावा.

यात्रेदरम्यान नेत्याने ठरवून दिलेली कामे प्रत्येकानेच करावीत. तशी शिस्तच लावून घ्यावी. यात्रेदरम्यान नमूद वेळापत्रकाशिवाय कोणतीही गोष्ट नेत्यास विचारूनच करावी. त्यास न सांगता गट सोडून जाऊ नये. स्वावलंबन व सहकार्यातून गटात खेळीमेळीचे वातावरण राहील ह्याकडे विशेष लक्ष्य द्यावे कारण कोणा एकाच्या असहकार्य वागणुकीमुळे गटात चिडचिड वाढून त्याचे परिणाम वाईट होण्याची शक्यता असते.

नेत्याची जबाबदारी: नेता हा एक अनुभवी गिर्यारोहक असणे अत्यावश्यक आहे. लांब पल्ल्याच्या, कठीण डोंगरयात्रांसाठी तर हे अनिवार्य आहे. संपूर्ण यात्रेची व सहभागींची जबाबदारी नेत्यावर असते त्यामुळे तो शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असायला हवा. त्याला यात्रेचे योग्य आयोजन, नियोजन करता आले पाहिजे. डोंगरयात्रेचे मुलभूत तंत्र-मंत्र नेत्याला माहित असायलाच हवे. त्यानुसार डोंगरयात्रेची आखणी केल्यावर नेत्याने यात्रेत सहभागी प्रत्येक सदस्याची वैयक्तिक माहिती जसे, नाव, वय, संपर्काचा पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, रक्तगट, क्षमता नोंदवून घ्याव्यात. सर्व डोंगरयात्रेचा एक साधारण तपशील तयार करून घ्यावा. त्यात डोंगरयात्रेचे सुरुवातीचे स्थान, मार्गक्रमण, शेवटचे स्थान, या सर्व स्थळांवर पोहोचण्याच्या अंदाजित वेळा, आणीबाणीच्या प्रसंगी संपर्काचे पत्ते, भ्रमणध्वनी, इत्यादी नमूद करावेत. त्याची एक प्रत, सहभागींच्या यादीसह स्वतः जवळ ठेवावी व दुसरी घरी, एका जबाबदार व्यक्तीकडे देऊन ठेवावी. स्वतःचा संपर्काचा पत्ता व भ्रमणध्वनीसुद्धा सहभागींना देऊन तो प्रत्येकाला आपापल्या घरी देण्यास सांगावा. या सगळ्या खटाटोपाचा उद्देश तातडीने मदत उभी करणे हा होय. यात कोणतीही कुचराई करू नये.

प्रत्येक यात्रेदरम्यान प्रवास व्यवस्था सोयीची करणे आवश्यक आहे. अनेक जणांना प्रवासातील आजार असतात. उलट्या, डोकेदुखी, अपचन, अंगात कणकण इत्यादी त्रास होण्याची शक्यता असते. सहभागींना असा त्रास होऊ नये किंवा झालाच तर अत्यल्प होईल या कडे नेत्याने लक्ष्य दिले पाहिजे. कारण सुरुवातीच्या प्रवासातील आरामावर सहभागीचा पुढील मार्गक्रमणातील वेळ व उत्साह अवलंबून असतो. यात्रेच्या सुरुवातीस होणारा असा त्रास त्या सहभागीची तसेच त्यामुळे इतरांची यात्रा वाईट करू शकतो. तसेच पायथा ते माथ्यापर्यंतच्या चढणीमध्ये व त्यातील कठीण टप्प्यांच्या ठिकाणी सहभागींना चढण्या-उतरण्यास मदत करावी. याचबरोबर संपूर्ण डोंगरयात्रेदरम्यान सहभागींना वेळोवेळी पुरेसे पाणी, खाद्यपदार्थ इत्यादी पुरवावे. डोंगरयात्रेत शरीराच्या निर्जलीकरणाचा त्रास पुष्कळ जाणवतो. त्यासाठी लेमन गोळ्या, जीवनअमृत (एलेक्ट्रोल) प्रत्येकाने जवळ ठेवावे व थोड्या थोड्या वेळाने सेवन करावे. नेत्याला प्रथमोपचाराचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. त्याने प्रत्येक यात्रेत सर्वसमाविष्ट प्रथमोपचार पेटी सोबत ठेवावी. यात्रेत तातडीच्यावेळी प्रथमोपचार पेटीचा योग्य वापर करून, योग्य उपचार मिळेपर्यंत वेळ निभावून नेण्यास नेता समर्थ हवा. याउलट कदाचित नेत्यालाच अपघात झाल्यास नेत्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन गटालाही सुरक्षित ठेवू शकणारा सक्षम उपनेता निवडणे हीसुद्धा नेत्याचीच जबाबदारी आहे.

डोंगरयात्रेदरम्यान सहभागींमध्ये गिरीभ्रमण, निसर्गदर्शन, निरीक्षण आणि संवर्धन यांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा तसेच सहभागींचे यात्रेशी संलग्न वैयक्तिक छंदसुद्धा जोपासले जातील याकडेही लक्ष्य द्यावे. संपूर्ण गटामध्ये संपूर्ण यात्रेदरम्यान आल्हाददायक व खेळीमेळीचे वातावरण राहील यासाठी प्रत्येक सहभागीने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी लहान-मोठे विनोद, गमतीदार प्रसंग, छोटे सांघिक खेळ इत्यादी उपयोगात आणता येतील. यामंध्ये उगाच कोणाची थट्टा करणे, विनोदाचा अतिरेक करणे, खोड्या काढणे इत्यादी प्रकार टाळावेत. कारण त्यामुळे गटामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहण्याऐवजी मन दुखावल्यामुळे भांडण-तंटे होण्याचीच शक्यता आहे. नेत्याने या सर्वांवर योग्य नियंत्रण ठेवावे. संघाची एकात्मता जपण्यासाठी विशिष्ठ घोषणा किंवा खुण ठरवावी.