User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

महाराष्ट्रातील, प्रामुख्याने सह्याद्रीतील गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण, यांचा शोध, संशोधन, परिचय, प्रसिद्धी आणि विकासाचे आणि इतर संलग्न उपक्रम, ते राबविणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, यांना, त्यांचे कार्य सह्याद्रीमित्रांसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन’ कार्यरत राहील.

मेलना दरम्यान, गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरणाशी निगडीत विषयांवर उपयुक्त माहितीपर व्याख्याने, स्लाईड शो, चित्रफिती प्रदर्शित करून सह्याद्री मित्रांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

आपल्यातील अनेकजण महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कुशीत अखंड भटकंती करत आहेत. काही येथील स्थळांची, भौगोलिक वैशिष्ठ्यांची माहिती जमा करून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. काही छायाचित्रे काढून लोकांना त्यांचे दर्शन घडवत आहेत. काही त्याच्या विकासासाठी अविरत झटत आहेत. काही असे गुणी कार्य करणारी माणसे घडवत आहेत. आपल्यातील अनेक जण काही ना काही कार्य करून सह्याद्रीचे, महाराष्ट्राचे पांग फेडायचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच! असे कार्य करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या ह्या छंदाच्या वेडाने झपाटून अशक्य कार्य करीत आहेत आणि आपल्या सर्वांनाच चकित करत आहेत. समस्त सह्याद्री आणि महाराष्ट्र प्रेमींच्या वतीने क्लबतर्फे, अशा गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.

गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण, प्रस्तरारोहण, दुर्गसंवर्धन, निसर्गसंवर्धन, मार्गदर्शन, साहित्य-लेखन, यांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ‘सह्याद्री मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. प्रत्येक वर्षी, अश्या उपक्रमांसाठी आजीवन झटणाऱ्या व्यक्तींमधील एका मान्यवर असामीला ‘सह्याद्री गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करून समस्त सह्याद्री मित्रांतर्फे त्यांच्या जीवनकार्याला मानाचा मुजरा करण्यात येईल.

संमेलनादरम्यान दरवर्षी वेगवेगळ्या विषयांखाली ‘सह्याद्री मित्र छायाचित्रण स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल. त्यातील निवडक छायाचित्रांना संमेलनादरम्यान प्रदर्शित केले जाईल आणि त्यातून पाच उत्कृष्ठ छायाचित्रकारांना पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक केले जाईल.

विविध स्पर्धा आणि पुरस्कारांच्या माध्यमातून संमेलनाचा उद्देश गाठण्याचा प्रयत्न करण्यात येईल.