User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

सर्व सह्याद्री मित्र ज्याची आतुरतेने वाट पहात होते ते ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन’ यथासांग पार पडले. २०१४ वर्षीचे संमेलन सह्याद्री मित्रांसाठी माहितीपर ठरले. त्याचाच घेतलेला हा आढावा:
या वर्षीचे ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन – २०१४’, एप्रिल महिन्याच्या १२ व १३ तारखेला,  मुंबईतील दादर येथे असणाऱ्या ‘ब्राह्मण सेवा मंडळ’ येथे आयोजित केले गेले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक उपयुक्त विषय आणि स्थळांच्या माहितीने परिपूर्ण असणारे संमेलन गिर्यारोहक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. संमेलनातील प्रवेश मुद्दाम ‘विनामुल्य’ ठेवण्यात आला, त्यामुळे सर्वच सह्याद्री मित्रांना सहज सहभागी होता आले. 

रवर्षी प्रमाणेच ज्येष्ठ इतिहाससंकलक माननीय श्री. आप्पा परब यांच्या शुभहस्ते समारंभाचे उद्घाटन झाले. नोंदणी कक्षेमध्ये सह्याद्री मित्रांची नोंदणी करून त्यांना ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलना’ची संकल्पना समजावणारे पत्रक देण्यात आले. या वर्षीसाठी ‘महाराष्ट्रातील अपरिचित गडकिल्ले’ हा विषय छायाचित्रण स्पर्धेसाठी देण्यात आला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातील प्रवेशिकांतून काही निवडक छायाचित्रे, संमेलनामध्ये प्रदर्शित करण्यात आली. शिवराजाभिषेक समितीतर्फे काही छायाचित्रे लावण्यात आली होती. विविध अपरिचित किल्ल्यांची छायाचित्रे पाहून आणि त्यांची माहिती घेऊन सह्याद्री मित्रांनी याही किल्ल्यांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. छायाचित्रांचे प्रदर्शन, संमेलनाचे दोन्ही दिवस सह्याद्री मित्रांना  खुले करण्यात आले होते.

‘स्ट्रॉब शॉप’तर्फे गिर्यारोहण आणि पर्यटनास आवश्यक अशा साधनसामग्रीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विविध उपयोगी साधनांची खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या सह्याद्री मित्रांना, ‘स्ट्रॉब शॉप’तर्फे त्यांची अल्पदरात खरेदी करण्याची संधी देण्यात आली. माननीय अप्पांनी कित्येक वर्षे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन जमविलेली माहिती त्यांनी आपल्याला पुस्तक स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. ही पुस्तके अत्यंत अल्प दरात वाचकांना मिळतात. ह्या माहितीचा लाभ सह्याद्री मित्रांनाही व्हावा, ह्या उद्दात्त हेतूने संमेलनात देखील अप्पांच्या पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात आले. श्री. अनिश गोखले या उदयोन्मुख लेखकाने त्यांच्या लेखणीतून साकार केलेलं ‘सह्याद्रीस टू हिंदुकुश’ हे इंग्रजी पुस्तकही प्रदर्शनास ठेवले होते. 

संमेलनाला दोन्ही दिवस अनेक गिरिमित्रांची, पर्यटकांची उपस्थिती लाभली. सह्याद्री मित्र संमेलनाचा उद्देश खऱ्या अर्थाने आकारास येऊ लागला आहे.

संमेलनाचे खास आकर्षण असणारी व्याख्याने आणि स्लाईड-शो यांच्या माध्यमातून जमलेल्या सर्व सह्याद्री मित्रांसमोर माहितीचा खजिना खुला केला गेला.

सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन – ओळख : सादरकर्ते, ‘रॉक क्लाइम्बर्स क्लब’चे सदस्य श्री. अनुराग वैद्य
या ओळखीमध्ये, संमेलनाची कल्पना, गरज, उद्देश, वैशिष्ट्ये आणि पुढील वाटचाल इत्यादींची थोडक्यात माहिती सह्याद्री मित्रांना करून  देण्यात आली .

भटकंतीतून अभ्यास : सादरकर्ते ज्येष्ठ इतिहाससंकलक माननीय श्री. आप्पा परब
माननीय आप्पा परब यांनी ह्या अनोख्या व्याख्यानातून सह्याद्री मित्रांना किल्ले, स्थाने पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन दिला. किल्ले पाहताना ऐतिहासिक, भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन कसा बाळगावा, कोणत्या इतर विषयांमध्ये रुची निर्माण करता येईल याची प्राथमिक माहिती दिली. नाव, इतिहास, स्थानिक कथा, गावकऱ्यांशी चर्चा इत्यादी माध्यमांतून एखादे ठिकाण कसे जाणून घ्यावे यावर विवेचन केले. ज्ञात इतिहासावर चिंतन करून काही अज्ञात इतिहास उलगडण्याचा प्रयत्न कसा करावा, त्याची भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भांशी सांगड घालून पडताळणी कशी करावी, इत्यादी बहुमोल मार्गदर्शनही केले. अप्पांचे गेल्या ६५ वर्षांचे संशोधन त्यांनी थोडक्यात मांडून, या अभ्यासाचा आधार घेऊन पुढे आणखी बहुमोल माहिती मिळविण्याचे आवाहन  सह्याद्री मित्रांना केले.

टायगर सायक्लो-वॉक: सादरकर्ते श्री. सुनील जोशी
१९८५ साली ‘वॉक नॉर्वे’ ही, तीन महिन्यांत २६८५ कि.मी.ची पदयात्रा करणाऱ्या सुनील जोशी यांना व्याघ्र संवर्धनासाठी अशी काही तरी मोहीम करावी असं वाटलं आणि त्यांतून ‘टायगर सायक्लो-वॉक’ या मोहिमेची सुरुवात झाली. १० डिसेंबर २०१३ ते १४ फेब्रुवारी २०१४ या साधारण ६० दिवसांत त्यांनी ‘ताडोबा ते मुंबई’ हे अंदाजे १२०० कि.मी. अंतर, त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पार केले . याच मोहिमेची माहिती त्यांनी स्लाईड-शो दरम्यान सह्याद्री मित्रांना दिली. मोहिमेची संकल्पना, सुरुवातीची तयारी, आयोजन व नियोजन, त्यातील टप्पे, भेटलेले लोक, मिळालेली मदत, मोहिमेचे यश, इत्यादींची माहिती त्यांनी प्रदर्शित केली. त्याच सोबत प्लास्टिकच्या चुकीच्या वापराचे जनावरांवर होणारे दुष्परिणाम दाखविणारी एक चित्रफितही त्यांनी दाखवली आणि तिच्या शेवटी सर्व उपस्थित सह्याद्री मित्रांकडून प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळण्याची शपथ वदवून घेतली.

ध्यास दुर्गसंवर्धनाचा: सादरकर्ते दुर्गवीर प्रतिष्ठान
दुर्गसंवर्धनासाठीच जणू जन्माला आलेल्या दुर्गवीरांना सोबत घेऊन मार्गक्रमण करत असलेली ही संस्था अल्पावधीतच सर्वांची आवडती झाली. सुरगड, मानगड, अवचितगड ह्या किल्ल्यांवरील त्यांच्या उपक्रमाची माहिती दुर्गवीरांनी चित्रफितीमार्फत सह्याद्री मित्रांसमोर प्रकट केली. उपक्रमाची आखणी, नियोजन व ती अमलात आणण्याची त्यांची पद्धत सर्वज्ञात करण्यात आली. दुर्गसंवर्धनासोबतच पायथ्याचे ग्रामसंवर्धन, त्यांना लहानमोठी मदत करून त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लावण्यास दुर्गवीर कसे यशस्वी झाले याचेही गुपित सह्याद्री मित्रांना कळविण्यात आले. या सर्व विधायक कार्यांसाठी पाठबळ देण्याचे आवाहनही त्यादरम्यान करण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही, छायाचित्र प्रदर्शन, साधन-सामग्री प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन, सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाले. रविवार असल्याने आणखी चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे ३ वाजता दुसऱ्या दिवशीची व्याख्याने आणि स्लाईड-शो सुरु झाले.

सह्याद्रीतील ‘ऑफबीट’ लढाया: सादरकर्ते श्री. ओंकार ओक
सह्याद्रीतील लढायांचा अभ्यास करणारे फारच कमी आहेत. लढाया म्हटलं की रक्तपातच; ह्या रुढिला छेद देणारा हा अनोखा स्लाईड-शो ओंकार ओक यांनी सादर केला. यात त्यांनी मोंगल आणि मराठे यांच्यात झालेल्या काही विचित्र लढायांची कहाणी सादर केली. साल्हेर किल्ल्याच्या परिसरात, मराठा फौजेने, मोगलांविरुद्ध वापरलेली अनोखे युद्धतंत्र, त्यांनी स्लाईड-शोच्या माध्यमातून सह्याद्री मित्रांसमोर सादर केले.

गद्धेगाळ – प्राचीन लेखांतील शापवचने: सादरकर्त्या डॉ. रुपाली मोकाशी
प्राचीन काळी एखादे दान, दानकर्त्याने किंवा कोणी इतरांनी परत घेऊ नये म्हणून दगडी शिल्पांवर शापवचने कोरून ती त्या ठिकाणी ठेवली जात. या कोरीव शिल्पांस गद्धेगाळ म्हणतात. मात्र ही शिल्पांचा व्हावा तसा अभ्यास झाला नाही कारण त्यांचे प्रयोजनच अनेकांना ठाऊक नाही. डॉ. रुपाली मोकाशी यांनी त्यांच्या स्लाईड-शो मध्ये ह्या गद्धेगाळीवर प्रकाश टाकला आणि सह्याद्री मित्रांच्या ज्ञानात भर टाकली. अनेक ठिकाणी त्यांना आढळलेल्या गद्धेगाळींची छायाचित्रेही त्यांनी प्रदर्शित केली आणि असे अपरिचित शिल्पकाम कोठेही दिसल्यास त्यांचा अभ्यास करावा किंवा त्यांची शक्य ती माहिती जमवून एखाद्या अभ्यासकास सुपूर्द करावी असे आवाहनही केले.

मुंबई परिसरातील लेणी: सादरकर्ते श्री. पंकज समेळ
मुंबईजवळील कल्याण आणि नालासोपारा ही प्राचीन शहरे आणि बंदरे असल्याने या स्थानाला अनेक समृद्ध संस्कृतींचा स्पर्श लाभला आहे. त्यातूनच येथे लेण्या खोदल्या गेल्या. मुंबई परिसरातील अशाच काही अपरिचित लेण्यांची माहिती पंकज यांनी स्लाईड-शोच्या माध्यमांतून दाखवली. लेण्यांचे प्रकार, संबंधित संस्कृती, त्यांचे भाग, महत्व इत्यादी गोष्टी त्यांनी सचित्र स्लाईड-शोच्या माध्यमांतून सह्याद्री मित्रांसमोर सादर केले आणि लेणी पाहण्याचा, अभ्यासण्याचा दृष्टीकोन दिला.

उंच माझा झोका (जायंट स्विंग): सादरकर्ते श्री. प्रांजल वाघ
सांधण दरीच्या मुखाशी हा अभिनव साहसी प्रयोग, प्रोबोसीस ट्रेनिंग एंड अॅडव्हेंचर्स प्रा. लि. तर्फे आयोजित करण्यात आला होता. २५० फुट रुंद आणि ५०० फुट खोल दरीमध्ये दोरांच्या साह्याने लोलक स्वरुपात पारंबी सारखा झोका तयार करण्यात आला. कंपनीचे संचालक श्री. अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लिष्ट सेट उप उभारण्यात आला. दगडांवर काही यशस्वी चाचण्या केल्यानंतर सुरज मालुसरे याने या टारझन जंपचा पहिला मान पटकाविला. या सर्व थरारक प्रयोगाचे चित्रण करण्यात आले होते, तेच या स्लाईड-शो दरम्यान सह्याद्री मित्रांसमोर सादर करण्यात आले.

आपल्यातील अनेकजण महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कुशीत अखंड भटकंती करत आहेत. काही येथील स्थळांची, भौगोलिक वैशिष्ठ्यांची माहिती जमा करून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. काही छायाचित्रे काढून लोकांना त्यांचे दर्शन घडवत आहेत. काही त्याच्या विकासासाठी अविरत झटत आहेत. काही असे कार्य करणारी माणसे घडवत आहेत. आपल्यातील अनेक जण काही ना काही करून सह्याद्रीचे, महाराष्ट्राचे पांग फेडायचा प्रयत्न करत आहेत व या छंदाच्या वेडाने झपाटून अशक्य कार्य करीत आहेत आणि आपल्या सर्वांनाच चकित करत आहेत. समस्त सह्याद्री आणि महाराष्ट्र प्रेमींच्या वतीने क्लबतर्फे,  अशा गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण, प्रस्तरारोहण, दुर्गसंवर्धन, निसर्गसंवर्धन, मार्गदर्शन, साहित्य-लेखन, यांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ‘सह्याद्री मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अशा उपक्रमांसाठी आजीवन झटणाऱ्या व्यक्तींमधील मान्यवर व्यक्तींना ‘सह्याद्री गौरव’ पुरस्काराने सन्मानित करून समस्त सह्याद्री मित्रांतर्फे त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला.

या वर्षीचे ‘सह्याद्री मित्र सन्मान पुरस्कारा’चे मानकरी आहेत:
०१. गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण (संस्था): कोल्हापूर हायकर्स
०२. गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण (व्यक्ती): संजय अमृतकर
०३. प्रस्तरारोहण (रॉक क्लाईम्बिंग) (संस्था): गिरीविराज हायकर्स
०४. प्रस्तरारोहण (रॉक क्लाईम्बिंग) (व्यक्ती): हिरा पंडित
०५. दुर्गसंवर्धन (संस्था): शिवाजी ट्रेल 
०६. निसर्गमित्र (व्यक्ती/संस्था): बॉम्बे नॅचुरल हिस्टरी सोसायटी
०७. मार्गदर्शक (व्यक्ती): भगवान चिले
०८. साहित्य (व्यक्ती) (कोणतेही माध्यम): महेश तेंडूलकर
०९. सह्याद्री गौरव (व्यक्ती): किरण अडफडकर

तसेच छायाचित्रण स्पर्धेमध्ये श्री. प्रांजल वाघ, श्री. रवी पवार, श्री. अजय हातेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय परितोषिक पटकावले तर कु. जयदा निकाळे हिला उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले.

अशा तऱ्हेने, अशा विविध अभ्यासपूर्ण व्याख्याने आणि स्लाईड-शोच्या माध्यमांतून सह्याद्रीमित्रांच्या ज्ञानात भर पडली. छायाचित्र प्रदर्शनांतून अपरिचित गडकोटांवर जाण्याची इच्छा त्यांच्यांत निर्माण करता आली. आप्पा आणि अनिश यांच्या पुस्तकांमुळे इतिहासाची दृष्टी मिळाली. ‘स्ट्रॉब शॉप’च्या साधन-सामग्री प्रदर्शन आणि विक्रीतून, गिर्यारोहण आणि पर्यटनास आवश्यक अशा वस्तूंची अल्पदरांत खरेदी, त्यांना करता आली. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे नुसते सोशिअल साईट किंवा नाम्मोल्लेखाने एकमेकांना ओळखत असलेल्या सह्याद्री मित्रांना, एकमेकांचा प्रत्यक्ष परिचय करून घेता आला. या क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींशी त्यांना प्रत्यक्ष संवाद साधता आला. एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा एक भाग बनून त्याचा आनंद लुटता आला. अशा उपक्रमांत सहभागी होऊन, महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या विकास उपक्रमांत नकळत भाग घेता आला. गुणवंत कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या केलेल्या कौतुकात सहभागी होता आले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देता आल्या. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे आपणही एक ‘सह्याद्री मित्र’ आहोत ही भावना त्यांना स्वतःच्या मनात जागृत करता आली.

संमेलन सार्थकी लागले :
शेकडोंच्या संख्येने सह्याद्री मित्र एकत्र आले होते. त्यांच्या भेटी-गाठींतून नवीन ऋणानुबंध जुळून आले होते. संमेलनास सहकार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला विचारल्यास ते स्वतःची ओळख ‘सह्याद्री मित्र’ अशी करून देतात.  महाराष्ट्रातील, प्रामुख्याने सह्याद्रीतील, गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण विकासासाठी अनेक संस्था ‘सह्याद्री मित्र’ छताखाली एकत्र येत आहेत; यातच ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन’ या अनोख्या उपक्रमाचे यश दडले आहे. संमेलनाच्या सांगतासमारंभात, ‘स्ट्रॉब शॉप’चे ‘श्री. विक्रमसिंह सूर्यवंशी’ आणि ‘माउंटन स्पोर्ट्स अकॅडेमी’चे ‘श्री. नंदू चव्हाण’ यांनी सह्याद्री मित्र स्नेहसंमेलनाला त्यांचा भक्कम पाठींबा दर्शविला आणि पुढील वर्षीही संमेलनास हातभार लावण्याचे आश्वासन दिले. नानाविध विषयांच्या शिंपल्यातील माहितीचे मोती वेचून श्रीमंत झालेल्या सर्व सह्याद्री मित्रांनी, संमेलनाच्या आयोजक आणि प्रायोजकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील वर्षीही संमेलनास उपस्थित राहण्याची इच्छा प्रकट केली. माननीय अप्पांच्या आशीर्वादाने पुढील ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन’ आणखी वैशिष्ठ्यपूर्ण करण्याचे वचन देत संमेलन २०१४ ची  सांगता केली.